fbpx

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ ।  राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण झालं आहे. मुंबई व नागपूर येथील हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा चांगला जोर बघायला मिळणार आहे. खासकरून कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रसह विदर्भात पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या किनारपट्टीच्या भागात ढगांची दाटी दिसत आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी सक्रीय वातावरण निर्माण झालं आहे, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. मागील 24 तासांत राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. पुण्यासह मराठवाडा व बाजूच्या परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी IMD कडे आल्या आहेत. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने खंड दिला होता. यामुळे खरिपातील पिकांची वाढ खुंटली होती, तर हलक्या जमिनीतील पिके माना टाकून सुकुन गेले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शेतीतील आंतरमशागतीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. पाऊस नसल्याने तो चिंतेत होता. गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. अंगाची लाही-लाही होत होती. पण आता पुढील काही दिवस पाऊस कोसळणार असल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, बाजरी आणि मूग या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज