पाचोरा पालिकेत राष्ट्रवादीचा नारा, स्वबळावर लढणार ३१ जागा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व ३१ जागांवर उमेदवार देणार देऊन स्वबळावर लढणार असल्याची घोषणा तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी नुकतीच केली. माजी आमदार दिलीप वाघ, नेते संजय वाघ यांच्या उपस्थितीत आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ही घाेषणा करण्यात आली.

बैठकीत बोलतांना तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी, शहरातील सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी तीव्र इच्छा सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली हाेती. ही निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढवली तर पक्षाची ताकद व जागा निश्चितपणे वाढणार आहेत. त्या अनुषंगाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली लवकरच प्रभागनिहाय जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनता व कार्यकर्त्यांशी संवाद साधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून परिवर्तन करण्याचा प्रयत्न पक्ष करेल, असेही ते म्हणाले.

राजकीय दबावतंत्र नाही
मित्र पक्ष शिवसेनेवर जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी ही स्वबळाची घाेषणा म्हणजे राजकीय दबावतंत्र तर नाही ना? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना तालुकाध्यक्ष विकास पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कुठलेही राजकीय दबावतंत्र नसून पक्ष स्वबळावर लढेल व सर्व ३१ जागांवर उमेदवार देणार असल्याचे ते म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज