अवैध धंदे, वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । महसूल विभाग, पोलीस प्रशासन व परिवहन विभागाकडून करण्यात येत असलेल्या दुर्लक्षामुळे अवैध धंदे, वाळू वाहतूक बिनधास्तपणे सुरु असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात, जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतूक करणारे संघटितपणे कामाला लागले आहेत. ज्या ठिकाणी मक्ते देण्यात येतात त्याप्रमाणे उपसा करण्यात येत नाही. अशा प्रकाराने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. एवढे असूनही महसूल, पोलीस व परिवहन विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे, अवैध वाळू वाहतूक, ओव्हर लोडींग वाहतूक होत आहे. थातुर मातुर कारवाई करून ही वाहने सोडण्यात येतात. वाहन मालकांवर महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अवैध वाळू उपसा करणारे बेदरकारपणे वाहन पळवितात. त्यांच्या या कृत्याने जळगाव जिल्ह्यात व शहरात वाहनांच्या धडकेत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी पडलेले आहेत. परंतु अद्यापपर्यंत अवैध धंदे, अवैध वाळू वाहतूक, अवैध वाहतूक व ओव्हर लोडींग वाहतूकीवर कारवाई करण्यात आलेली नाही. असे नमूद करण्यात आले आहे.

दि.२४ रोजी तरसोद फाट्याजवळ एका महिलेचा तर दि.२५ रोजी के.सी.पार्कजवळ दोन व्यक्तींचा नाहक बळी गेला आहे. अवैध धंदे, वाळू उपसा करणाऱ्यांकडून संघटित गुन्हेगारी पद्धतीचा अवलंब केला जात असून दिवसेंदिवस वाळू उपसा करणाऱ्यांचे मनोधर्य वाढत आहे. अवैध धंदे, अवैध वाळू वाहतूक, अवैध वाहतूक व ओव्हर लोडींग वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई झाल्यास याला निश्चित आळा बसेल. मात्र प्रत्येक वेळी निवेदन देऊनही कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा गोष्टींमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या परिवाराची जबाबदारी आपण घ्यावी, अन्यथा गंभीर परिणामास व जनआंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

अवैध धंदे, अवैध वाळू वाहतूक, अवैध वाहतूक व ओव्हर लोडींग वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, राजू मोरे, सुशील शिंदे, जितेंद्र बागरे, विशाल देशमुख, नईम खाटीक, गोटू चौधरी, अकील पटेल, भगवान सोनवणे, रमेश बहारे, डॉ.रिजवान खाटीक, रहीम तडवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज