जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । राज्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मागणी आधारीत धोरणातंर्गत अनेक पाणी पुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त बाह्य अर्थसहाय्यीत जलस्वराज्य प्रकल्प, आपलं पाणी प्रकल्प यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून नळपाणी पुरवठा योजना, लघु नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहिरींवरील योजना यासारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.
ग्रामीण पाणी पुरवठ्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना तसेच महाराष्ट्र भूजल अधिनियमांतर्गत भूजल संवर्धनाच्या उपाययोजना केल्या जात आहेत. या योजनेमुळे गावात पाण्याची टंचाई भासणार नाही व या योजनेद्वारे स्वच्छ पाणी मिळेल.आज आपण राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची व्याप्ती, वर्गीकरण, अटी, कागदपत्रे, लाभ व संपर्क कुठे साधावा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
???? ‘या’ योजनेचा मुख्य उद्देश काय? :
ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत सम प्रमाणात ५०:५० टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गावाचे, जिल्ह्याचे तसेच राज्याचे जलसुरक्षा आराखडे व वार्षिक कृती आराखडे तयार करणे बंधनकारक करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये भूजल व भूपृष्ठीय पाण्याचा संयुक्त व शाश्वत वापर, भूजल संवर्धन आणि पाण्याची गुणवत्ता या बाबींवर भर देण्यात आला आहे. पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी व व्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविणे हा या मुख्य उद्देश आहे.
???? राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व्याप्ती :
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या धर्तीवर राबविण्यात येत असलेला “मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम (MRDWP)” हा राज्यातील सर्व ग्रामीण भागास लागू राहील. नव्याने निर्माण होत असलेल्या अथवा निर्माण झालेल्या नगरपंचायती/नगर पालिका / नागरी क्षेत्रासाठी हा कार्यक्रम लागू राहणार नाही. गावातील नागरिकांना व शहर लगतच्या नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने लाभ मिळेल.
☑️ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना वर्गीकरण
● मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचे प्रामुख्याने खालील तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात येत आहे.
● मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत हाती घ्यावयाच्या नवीन योजना
● राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन
● प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती.
● राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे अशा प्रकारे तीन प्रकारात वर्गीकरण केलेले आहे.
???? ‘या’ योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व कागदपत्रे काय? :
अटी :
● 100 टक्के घरगुती नळ जोडण्याचा समावेश अनिवार्य.
● जलस्वराज्य प्रकल्पाच्या धर्तीवर गाव कृती आराखडा तयार करणे.
● गाव हगणदारीमुक्त होणे आदी.
???? आवश्यक कागदपत्रे : प्रस्तावित योजनांसाठी आवश्यक त्या जमिनीचे संपादन, महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे किंवा आवश्यक त्या विभागांच्या परवानग्या घेणे.
???? राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना लाभ व संपर्क
लाभ :
● गावातील सर्व नागरीकांना घरोघरी किमान ४० LPCD पाणी उपलब्ध करुन देणे.
● शहरालगतच्या ग्रामपंचायती/वाड्या व वस्त्यांसाठी ७० LPCD
● इतर ग्रामपंचायती/ वाड्या व वस्त्यांसाठी ४० LPCD
● संपर्क कुठे साधावा:-
-सर्व जिल्हा परिषद
-महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
-पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
???? टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.