fbpx

मविप्र वाद : भोईटेंकडून भोईटेंच्या घरावर हल्ला, दगडफेक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । दि.२४ मे २०२१ – येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या वादातून जयवंत भोईटे यांच्या घरावर रात्री १.४५ च्या सुमारास काही जणांनी दगडफेक करीत हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, निलेश भोईटे व त्यांच्या गुंडांनी हा हल्ला केला असल्याची तक्रार जयवंत भोईटे यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. दरम्यान, रात्री तालुका पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदारने योग्य तक्रार नोंदवली नसल्याने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याचे त्यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.

मुक्ताई नगरातील विठ्ठल पार्कमध्ये राहणारे जयवंत बाबुराव भोईटे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मी जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव या संस्थेचा संचालक असून या संस्थेत मानद सचिव असलेल्या नीलेश भोईटे याने केलेल्या गैर कारभार बाबत मे. उच्च न्यायालय तसेच शासनाच्या अनेक विभागांकडे तक्रारी केलेल्या आहे. त्यातून नीलेश भोईटे व त्याच्या गुंड हस्तक यांनी अनेक वेळा मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. याबाबत मी आपल्या पोलीस प्रशासनाकडे वेळी वेळी तक्रारी दिल्या आहे. परंतु आज दिनांक २४/०५/२०२१ रोजी मध्यरात्री दोन वाजता नीलेश भोईटे याने रात्री ०१.४५ वाजता त्याचा गुंड हस्तक कल्पेश भोईटे याला इतर दोन गुंड देऊन माझ्या घरावर जीवघेणा हल्ला केला. यात कल्पेश भोईटे याने मोठ मोठे दगड माझ्या परिवारातील लोकांवर भिरकवले. त्यातील दोन ते तीन दगड घरात आल्याने महिला व लहान मुले बाल बाल बचावले. त्यानंतर कल्पेश भोईटे याने घराच्या कंपाऊंडमध्ये उडी मारत तुटलेल्या खिडकीतून अश्लील शिवीगाळ केली आणि धमकी दिली की, नीलेश भाऊच्या विरोधात आडवा येतो का जया हा फक्त ट्रेलर असून आठवडा भरात नीलेश भाऊ तुला व तुझ्या परिवाराला जिवंत ठेवणार नाही. जया बाहेर निघ तुला आताच संपवतो. परंतु शेजारील लोक बाहेर आल्याने कल्पेश आणि त्याच्या सोबत आलेले गुंड पळून गेले.

या घटनेची तक्रार देण्यासाठी मी जळगाव तालुका पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेलो असता तेथील ठाणे अमालदार श्री.तायडे यांनी माझ्या तक्रारी प्रमाणे फिर्याद न घेता अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. नीलेश भोईटे याने पाठविलेले गुंडांचा उद्देश माझा व माझ्या परिवारातील सदस्यांचा जीव घेणे असताना त्यांनी याबाबत कोणतेही गांभीर्य दाखविले नाही. या घटनेने माझ्या परिवारातील लहान मुले व महिला प्रचंड घाबरल्या असून आमच्या जीवितास धोका असून आरोपी कल्पेश भोईटे याने परत येऊन मुडदे पडण्याची धमकी दिलेली आहे.

तरी आपणास विनंती की नीलेश भोईटे, कल्पेश भोईटे व त्याच्या इतर गुंड साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी विनंती जयवंत भोईटे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज