पाळधी महामार्गावर कापूस व्यापाऱ्याची हत्या, हवाल्याच्या पैशांसाठी खून?

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहारातून एका व्यक्तीकडून अंदाजे १५ लाखांची रक्कम घेऊन दोन कापूस व्यापारी फरकांडे ता.एरंडोल येथे जात होते. पाळधीजवळ महामार्गावर दुचाकीने आलेल्या चौघांनी चारचाकी अडवत लूट केली आहे. व्यापाऱ्याचा खून करून चौघांनी पळ काढला असला तरी रोकड ते घेऊन जाऊ शकले नाही. दरम्यान, रोकड हवाल्याची असल्याचे समजते.

फरकांडे येथील धनदाई ट्रेडर्सचे कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी हे चारचाकी क्रमांक एमएच.०१.एएल.७१२७ ने दिलीप राजेंद्र चौधरी याच्यासोबत जळगावला आले होते. दोघे दुपारी जळगावात आल्यानंतर त्यांनी दोन व्यापाऱ्यांकडून अंदाजे १५ लाख रोकड घेऊन ते पुन्हा घरी जात होते.

प्रतापनगरातून ८ वाजेच्या सुमारास एका मेडिकलहून वडिलांच्या गोळ्या घेतल्यानंतर ते पाळधीच्या दिशेने निघाले होते. पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या पुढे गेल्यावर ८.३० च्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळ महामार्गावर दोन दुचाकीने आलेल्या चौघांनी चारचाकीसमोर दुचाक्या आडव्या लावल्या. शिवीगाळ करीत त्यांनी पुलावर तुम्ही एकाला धडक दिली असल्याचे सांगितले. चारचाकीचा काच खाली करताच एकाने हात घालून दरवाजा उघडला तर दुसरा मागील सीटवर बसला. मागे बसलेल्या हल्लेखोराने लागलीच चाकू काढून वाहन चालवीत असलेल्या स्वप्नील शिंपी यांच्यावर हल्ला केला.

चाकु पाहताच मागे बसलेला दिलीप चौधरी हा बाहेर पडला तर स्वप्नील शिंपी हे देखील बॅगसह बाहेर पडले. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करीत आणखी वार केले. मारहाणीत शिंपी रस्त्याच्या कडेला पडले. दिलीप चौधरी याने मदतीसाठी आरडाओरड केल्याने दोन तरुण धावून आले. त्यांना पाहताच हल्लेखोरांनी पळ काढला. गंभीर दुखापत झाल्याने स्वप्नील शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला. मयत शिंपी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून नातेवाईकांनी गर्दी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले हे पथकासह आले असून दिलीप चौधरीकडून माहिती घेत घटनास्थळी गेले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -