ब्लेड न दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन गुन्हेगाराने केला तरुणाचा गेम, दोघे ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री सुनील टेमकर या सलून व्यावसायिक तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून केवळ ब्लेड न दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन गुन्हेगाराने हा खून केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.

ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात सुनील सुरेश टेमकर हा तरुण कुटुंबासह राहतो. चौघुले प्लॉट परिसरात त्याचे सलून दुकान असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. गेल्या पाच दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा दुकानावर आला. त्याने टेमकरला ब्लेड मागितले. टेमकर याने ब्लेड देण्यास नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला.

वाद वाढल्याने अल्पवयीन मुलाने टेमकरच्या छातीत चाकूने वार केले. यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू करताच त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट देत तात्काळ तपासाच्या सूचना केल्या. शनीपेठ पोलिसांनी अल्पवयीन गुन्हेगारांच्या एका टोळीचा म्होरक्या यात मुख्य संशयीत असल्याचे निष्पन्न केले. परिसरात शोध घेऊन दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून नेमके हत्यार कोणते हे ते सांगू शकले नाही. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे हे तपास करीत असून पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगा हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज