महापालिका नगरसेवक अपात्रतेप्रकरणी ८ रोजी कामकाज

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या २७ नगरसेवकांविरोधात भाजप विरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी भाजपने विभागीय आयुक्तांकडे दाखल याचिकेवर नाशिक येथे ७ रोजी सुनावणी आहे. खंडपीठात ८ रोजी कामकाज होणार आहे. मात्र, त्याआधी भाजप बंडखोर नगरसेवकांचा एक गट मुंबईला रवाना झाला असून, काही महत्त्वाच्या विषयांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती अमोर आली आहे.

मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपच्या २७ नगरसेवकांनी भाजपविरोधात बंडखोरी करत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. या प्रकरणी भाजप गटनेते भगत बालाणी यांनी २७ नगरसेवकांविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली होती. आतापर्यंत या याचिकेवर चार सुनावण्या झाल्या असून, दोन्ही बाजूच्या नगरसेवकांची बाजू विभागीय आयुक्तांनी ऐकून घेतली आहे. त्यामुळे आता ८ रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे मनपाच्या सर्वच नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. हा निर्णय मनपासोबतच शिवसेना व भाजपसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच बंडखोर नगरसेवकांपैकी उपमहापौर कुलभूषण पाटील,ऍड. दिलीप पोकळे, चेतन सनकत यांच्यासह काही नगरसेवक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

गिरीश महाजन व एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचा विषय 

महापालिकेतील नगरसेवकांच्या अपात्रतेचा विषय माजी मंत्री गिरीश महाजन व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. महापालिकेत भाजपचे बहुमत असताना शिवसेनेने या सत्तेला सुरुंग लावला होता. महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नेतृत्व करून, जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणली होती. मात्र, अडीच वर्षांत भाजपला ही सत्ता गमवावी लागली.

मनपातील सत्तांतरात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी भूमिका घेतली होती. तसेच अपात्रतेबाबत देखील नगरसेवकांना हमी दिली होती. आता नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी गिरीश महाजन, तर अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी हा विषय प्रतिष्ठेचा असून, बुधवारी होणाऱ्या कामकाजाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -