fbpx

महावितरणची ग्राहकाभिमुख वाटचाल

mi-advt

संपूर्ण देशाबरोबर गेल्या सव्वा वर्षापासून महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य सेवेसह इतर सर्व अत्यावश्यक सेवांना मोलाची साथ मिळाली ती महावितरणच्या प्रकाशदूतांची. ‘न्यू नॉर्मल’मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या व्यक्ती तसेच निर्बंधकाळात नागरिकांना घरात बसणे सुसह्य करण्यात महावितरणकडून करण्यात आलेल्या सुरळीत विद्युतपुरवठ्याचा महत्त्वाचा वाटा आहे. कोरोनाशी लढताना जिवाची पर्वा न करता महावितरणचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिन कोरोनायोद्ध्यांच्या भूमिकेत राहून सुरळीत सेवेसाठी तत्पर आहेत. या पार्श्वभूमीवर 6 जून रोजी 16 वर्षे पूर्ण करणाऱ्या महावितरणच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा.

तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पुनर्रचनेनंतर विद्युत वितरणाची जबाबदारी आलेल्या महावितरणने मागणीएवढी वीज, वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण, ग्राहकांना ऑनलाईन वीजजोडण्या, मोबाईल ॲप, वीजबिल भरण्यासाठी विविध सुविधा, मीटर रीडिंगसाठी अत्याधुनिक यंत्रणा, वेळेवर व अचूक बिलांसाठी केंद्रीकृत बिलिंग प्रणाली, कृषिपंपांना मोठ्या संख्येने जोडण्या आदी कामे केली आहेत. ‘जनतेसाठी विद्युतशक्ती’ हे ब्रीद घेऊन गेली 16 वर्षे दर्जेदार वीजपुरवठ्याबरोबरच ग्राहकांना समाधानी ठेवण्याचे आव्हान महावितरणने यशस्वीपणे पेलले आहे. महावितरणने ग्राहकसेवेचे नवीन मानदंड गेल्या काही वर्षांत निर्माण केले असून, जगातील सर्वश्रेष्ठ विद्युत वितरण कंपनी होण्याकडे महावितरणची वाटचाल सुरू आहे.

पुनर्रचनेनंतर म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीसह महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांनी आपापल्या क्षेत्रात अतिशय समर्पित पद्धतीने काम केले. त्यामुळेच आज महाराष्ट्राचा विद्युत क्षेत्रात लौकिक आहे. आज महावितरणची यंत्रणा 20,000 मेगावॅटपेक्षा अधिक वीज वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी महावितरणने पायाभूत आराखडा टप्पा-1, टप्पा-2 तसेच दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक विद्युत विकास योजना यशस्वीपणे राबवल्या. ग्राहकाला योग्य दाबाने दर्जेदार वीजपुरवठा करण्यासह अनुषंगिक सेवाही चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. ग्राहकाला आपल्या दारात यायला लागू नये, म्हणून सर्व वीजजोडण्या ऑनलाईन देण्याची सोय करण्यात आली. सौभाग्यसारख्या योजनेमुळे शेकडो गावे व वाड्यावस्त्यांवरील लाखो घरात वीज पोचली. गेल्या 16 वर्षांत महावितरणची ग्राहक संख्या 1.69 कोटींवरून 2.78 कोटी एवढी प्रचंड वाढली.

ग्राहकाला वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेवर बिल मिळावे यासाठी तसेच बिल भरण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी ऑगस्ट-2018 पासून वीजबिल तयार करण्याची प्रक्रिया केंद्रिय स्तरावर सुरू झाली. मीटर रीडिंगमधील पारदर्शकतेसाठी इलेक्ट्रॉनिक मीटर्स बसविली गेली. उद्योगांसाठी स्वयंचलित मीटर रीडिंगची यंत्रणा आली. ग्राहकाला वीजबिले भरण्यासाठी ऑनलाईनसह वीज बिल भरणा केंद्रांची सोयही आहे. आधुनिकतेची कास धरत महावितरणने ग्राहकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲप विकसित केले. 50 लाखांहून अधिक ग्राहकांनी डाऊनलोड केलेल्या मोबाईल ॲपवरच बिलाचा तपशील पाहण्यासह त्यावरून बिलही भरता येते. ग्राहकांना बिलाची रक्कम, खंडित वीजपुरवठा आदी माहिती देण्यासाठी एसएमएस सेवेस सुरुवात करण्यात आली. ग्राहकांच्या सोयीसाठी एप्रिल-2017 पासून नवीन जोडणी, नावात बदल आदींसाठी मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला. तसेच औद्योगिक ग्राहकांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला. ग्राहकसेवेचा दर्जा उंचावल्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. त्यामुळे 24 तास सुरू असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रांचे आधुनिकीकरण करून वीजपुरवठा व वीजबिलांच्या तक्रारी सोडवण्याची जबाबदारी दोन विशेष टीमकडे देण्यात आली. महावितरणने आपल्या संकेतस्थळाचे स्वरूप मे-2018 मध्ये बदलून ते अधिक ग्राहकस्नेही केले. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता व कंत्राटदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. तसेच कोणतेही कार्यादेश व देयक ईआरपी प्रणालीद्वारेच दिले जात आहे.

वीज वापरात शिस्त यावी म्हणून वीजचोरीविरुद्ध सातत्याने मोहिमा राबविण्यात आल्या व येत आहेत. तसेच पायाभूत आराखड्यात झालेल्या कामांमुळे वितरण हानी आता कमी झाली आहे. त्याबरोबरच जळणाऱ्या रोहित्रांचेही प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आलेले आहे. गेल्या काही वर्षांत विजेच्या मागणीनुसार विजेच्या उपलब्धतेचे योग्य नियोजन केल्याने वीज खरेदी दर कमी करण्यात यश मिळाले. मार्च-2018 अखेर पैसे प्रलंबित असलेल्या 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणालीचे काम प्रगतिपथावर आहे. यात एका रोहित्रावर केवळ दोन शेतकऱ्यांना जोडणी दिल्याने सुरळीत वीजपुरवठा होण्याबरोबरच रोहित्र नादुरुस्त होण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेची कामे जोमाने सुरू आहेत.

माहिती तंत्रज्ञानात, देशाच्या विद्युत क्षेत्राच्या तुलनेत महावितरणमध्ये खूप मूलभूत काम झाले. या आणि इतर चांगल्या कामांचा अभ्यास करण्यासाठी इतर राज्यातील अनेक पथके येऊन गेली. महावितरणला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अर्थात विजेच्या क्षेत्रात पूर्वीच्याच नव्हे तर कालच्याही लौकिकावर जगता येत नाही. प्रगतीपुस्तक रोज बदलत असते. त्यामुळेच सातत्याने सजग राहून ग्राहकराजा जास्तीत जास्त समाधानी कसा राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापुढील काळातही दर्जेदार वीजपुरवठ्याबरोबरच ग्राहकाला समाधानी ठेवण्यात महावितरण यशस्वी होईल, यात शंका नाही.

गेल्या सव्वा वर्षात अखंडपणे सुरळीत विद्युतसेवा देतानाच महावितरणचे शेकडो कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यावरही मात करत कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू होऊन सेवा बजावत आहेत. दुर्दैवाने या महामारीने महावितरणचे अनेक कर्मचारी हिरावून नेले. आपल्या सहकाऱ्यांच्या जाण्याचे दु:ख बाजूला ठेवून महावितरणचे कोरोनायोद्धे ग्राहकसेवेचे व्रत हाती घेऊन सुरळीत विद्युतसेवेसाठी सज्ज आहेत.

– ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज