महावितरणचा दणका : जळगाव जिल्ह्यात २१ हजार ग्राहकांची वीज खंडित

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ ।  वीजबीलांची थकबाकी न भरल्याने जळगाव जिल्ह्यातील २० हजार ९१६ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तर परिमंडळातील जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील अशा एकूण ५६ हजार २६९ वीजग्राहकांचे कनेक्शन बीले न भरल्याने तोडण्यात आले आहे.

महावितरणकडून वीज बील वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची मोहीम जोमाने राबवण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांसह, औद्योगिक व शेतीपंपाचाही समावेश आहे. दिवाळीनंतर ही मोहिम जोरात राबवण्यात येत असून, याकामी अभियंत्यांनाही उद्दीष्टे देण्यात आली आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वीज खंडित केलेल्या ग्राहकांची संख्या

जळगाव (२०९१६), धुळे (१६५०८), नंदुरबार (१८८४५).

अशी आहे थकबाकी

{ परिमंडळात १२ लाख ५ हजार ९८ घरगुती ग्राहकांकडे १२८ कोटी ४३ लाख थकबाकी.
{ ८५ हजार ६८५ व्यावसायिक ग्राहकांकडे २२ कोटी.
{ २० हजार २१२ औद्योगिक ग्राहकांकडे ३४ कोटी लाख.
{ ३ लाख ५५ हजार ८७४ कृषी ग्राहकांकडे ४८२९ कोटी ५ लाख.
{ ५ हजार ६०३ पथदिवे ग्राहकांकडे ७३६ कोटी २८ लाख.
{ ४ हजार ४३७ सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांकडे ३८९ कोटी ५ लाख.
{ ९ हजार ६५ इतर वर्ग वारीतील ग्राहकांकडे ८ कोटी ४ लाख.
{ ६७२ उच्च दाब ग्राहकांकडे ९४ कोटी ९१ लाख.
{ १६ लाख ८६ हजार ग्राहकांकडे ६ हजार २४१ कोटींची थकबाकी.

वसुली न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना मोहिमा राबवण्याचे निर्देश महावितरणने दिले असून, थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने ही मोहिम तीव्र केली आहे. याकामी महावितरणने सर्वच यंत्रणा थकबाकी वसुलीसाठी लावली आहे. यासह प्रसंगी पोलिस संरक्षण घेण्यात येणार असल्याचे महावितरणने कळवले आहे.

दरम्यान, ही मोहिम यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलांचा त्वरित भरणा करावे असे आवाहन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज