जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील २८ वर्षीय विवाहितेने कुटुंबीय शेतात गेले असताना घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, विवाहितेने दोघा चिमुकल्यांना आत्महत्येपूर्वी विषारी कीटकनाशक पाजल्याचा संशय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एका मुलाची प्रकृती गंभीर असून आत्महत्येचे कारण समजलेले नाही.
भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे अश्विनी किशोर चौधरी या परिवारासह राहतात. अश्विनी यांचे पती किशोर हे खासगी फायनान्स बँकेत नोकरीला होते परंतु लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने ते शेती करत होते. अश्विनीने बुधवारी सकाळी १०.१५ ला आत्महत्या केली तेव्हा श्रेयस (वय ९) आणि प्रणव (वय ३) हे मुलेही घरीच होते. श्रेयस रडत बाहेर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोन्ही मुलांना उलट्या झाल्याने त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मुलांना कीटकनाशक दिल्याचे स्पष्ट झाले असून श्रेयसची प्रकृती गंभीर आहे.
घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही.