जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ३ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या कारवाईत जळगावचे दोन आणि रावेर येथील एक अशा तिघांना अटक झाली होती. पैकी पोलिसांनी रावेर येथील संशयिताकडून आणखी ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. एक बनावट ग्राहक तयार करून १ लाख रूपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ३ लाखांच्या बनावट नोटा घेण्यासाठी संबंधितांशी संपर्क साधला. यानंतर तिघे बनावट नोटा देण्यासाठी भुसावळात येताच
पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. सय्यद मुशाहीद अली मुमताज अली (वय ३८, रा.उस्मानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव), नदीम खान रहीम खान (वय ३५, रा. सुभाष चौक, शनिपेठ, जळगाव), अब्दुल हमीद कागल (वय ५७, रा.रसलपूर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) अशी त्यांची नावे आहेत. तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत १० सप्टेंबरला संपणार आहे.
पाच जणांची टोळी, दोघे पसार
बनावट नोटांच्या प्रकरणात पाच जणांच्या टोळीचा समावेश आहे. शिवाय या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशात देखील जुळले आहेत. त्यामुळे दोघांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.