..तर तुला जिवंत ठेवणार नाही’; एकतर्फी प्रेमातून तरुणाची धमकी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । जळगावात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून तिच्याशी अश्लील कृत्य करत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘फक्त माझी आहेस, तूजर माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ या शब्दांत एकतर्फी प्रेमातून कुलदीप रवींद्र सपकाळे (रा. बांभोरी, ता. धरणगाव) याने शिवीगाळ करत १७ वर्षीय मुलीला धमकी दिली आहे. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता महामार्गावरील अग्रवाल चौकात घडला. दरम्यान, याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदीप हा गेल्या काही दिवसांपासून गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. एकतर्फी प्रेमातून तो पीडित मुलीचा अनेकदा पाठलाग करायचा.

दरम्यान, गुरुवारी पीडित मुलगी आपल्या एका मैत्रिणीसोबत कामानिमित्त बाहेर गेली होती. दोन्ही मुली अग्रवाल चौकातून जात असताना, आरोपी कुलदीपने पाठलाग करत पीडित मुलीला भररस्त्यात आडवलं. यावेळी आरोपीनं ‘तू फक्त माझी आहेस, आणि तू माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशा शब्दांत आरोपीनं पीडित मुलीला धमकी दिली आहे. यावेळी आरोपी पीडित मुलीच्या मैत्रिणीला देखील अश्लील शिवीगाळ केली आहे. तसेच दोघींना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे.

ही घटना घडताच पीडित मुलीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज