fbpx

शिवसेनेच्या जाहिरातीत ‘एमआयएम’चे नगरसेवक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले असून शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी करण्यात आली आहे. शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेल्या भाजपच्या बंडखोर नगरसेवकांसह एमआयएमच्या नगरसेवकांचे फोटो जाहिरातीत झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनी सोडून सेनेत प्रवेश केला की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.

जळगाव शहर मनपात  एमआयएम पक्षाचे रियाज बागवान, सुन्नाबी राजू देशमुख, सईदा युसूफ शेख निवडून आले आहेत. मनपात काही महिन्यांपूर्वी भाजपच्या २७ बंडखोर आणि एमआयएमच्या ३ नगरसेवकांच्या पाठिंब्याने शिवसेनेने मनपाची सत्ता काबीज केली. नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिल्याने तिन्ही नगरसेवकांना पक्षाने नोटीस बजावली होती. पक्षाकडून तिघांवर कारवाई देखील केली जाणार होती दरम्यान त्यावर खुलासा दिल्याने ते प्रकरण शांत झाले होते. 

शिवसेनेचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेकडून शहरभर बॅनरबाजी आणि जाहिराती करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या जाहिरातीमध्ये एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे  एमआयएमच्या नगरसेवकांना पक्षाने तंबी दिल्यानंतरही ते सेनेसोबत आहेत की काय? किंवा ते सेनेत प्रवेश करणार का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांच्याशी याबाबत संपर्क केला असता, जाहिरातीमध्ये आम्हाला न विचारता फोटो प्रसिद्ध करण्यात आले असून याबाबत महापौर व उपमहापौर यांना विचारणा करणार आहे. आम्ही एमआयएममध्येच असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने शिवसेनेला साथ दिली असल्याचे रियाज बागवान यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt