जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । व्यवसाय कोणताही असो तो करीत असताना तुम्हाला ग्राहकाला आनंदी ठेवता आले पाहिजे. ग्राहकाला केंद्र बिंदू मानून काम कराल तर यश निश्चित राहील. व्यवसायात जितकी किंमत तुमच्या वस्तूला आहे तितकीच किंमत तुमच्या वागण्या व बोलण्याला देखील आहे. व्यवसायात तुमचा स्वभाव तुमची प्रगती ठरवतो. कामाची पद्धत, एकाग्रता, अभ्यास हा नेहमीच महत्त्वाचा असतो त्यात सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन उद्योजक किरण कासार यांनी केले.
येथील केसीई सोसायटीच्या आयएमआर महाविद्यालयात उद्योजकता विकास सेलतर्फे उद्योजकता दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोणतीही बिझनेस फॅमिलीची पार्श्वभूमी नसताना, शून्यातून उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या किरण कासार आणि उद्योजक प्रमोद संचेती या दोन महत्त्वपूर्ण उद्योजकांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. पुढे बोलताना किरण कासार यांनी सांगितले की, १९८७ साली स्वतःचा व्यवसाय सुरू केला. १० वर्षे स्वतःची गाडी स्वतः चालवली. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय होता. काही पार्ट मिळत नव्हते म्हणून स्पेअर पार्टचे दुकान सुरू केले. आयुष्यात नेहमी पुढचाच विचार केला. आज ५० ते ६० कोटींचा व्यवसाय करतो. त्यानंतर सुनील तरोडकर यांनी अनुभव सांगितले. प्रास्ताविक संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन एमबीएचे समन्वयक डॉ. पराग नारखेडे आणि एन्ट्राप्रिनर सेल प्रमुख डॉ. शमा सराफ यांनी केले. प्रा. जयश्री महाजन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला डॉ. अपर्णा भट कासार, सुनील ओवळे, डॉ. ममता दहाड व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.