fbpx

मासिक पाळीविषयी दक्ष राहिल्यास सुदृढ आरोग्य टिकून राहील

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । मासिक पाळी हि एक स्त्रीसुलभ नैसर्गिक बाब आहे. ती स्त्रीत्वाची अमूल्य अभिव्यक्ती आहे. या पाळीच्या काळात स्त्रियांना अशुद्ध समजणे, विटाळ मानणे तसेच घरकाम, पूजाअर्चा, धार्मिक कार्यक्रमात सहभागी न करणे हे चुकीचे आहे. यामुळे स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावतात. या समस्या नंतर मोठे आजार देखील निर्माण करू शकते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नेहमीप्रमाणेच आदराची वागणूक द्यायला हवी असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस २८ मे रोजी साजरा केला जातो. मासिक पाळी  हि साधारणतः २८ दिवसांनी येते व रक्तस्त्राव सरासरी ५ दिवस असतो. त्यामुळे पाचव्या महिन्याची अठ्ठावीस तारीख म्हणजेच २८ मॆ रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर डॉ. संजय बनसोडे यांनी माध्यमाद्वारे महिलांसाठी उपयुक्त माहिती सांगितली.  कोरोना महामारीमुळे अनेक महिलांना मासिक पाळीची कुचंबणा जाणवत आहे. शाळा बंद असल्याने शाळेतून दिले जाणारे सॅनिटरी पॅड देखील आता मिळेनासे झाले आहे. लोकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्यानेदेखील सॅनिटरी पॅड खरेदी कमी झाली आहे. घरगुती कापड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकडाऊनमुळे घरगुती कामाची जबाबदारी वाढली, एकान्तवासाचा अभाव यामुळे मासिक पाळीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.

मासिक पाळी  व  कोरोना लसीकरण या संबंधित समाजमाध्यमातून गैरसमज पसरले गेले. पण कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे पाळीत, पाळीच्या अगोदर किंवा नंतरही करता येते. कोरोना लसीकरणाचा मासिक पाळी अथवा मासिक पाळीचा कोरोना लसीकरणावर परिणाम होत नाही.

मासिक पाळीत स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. अस्वच्छतेमुळे मूत्र मार्ग व जननेंद्रियाचे जंतुसंसर्ग होऊ शकतात. पाळीदरम्यान नियमित आंघोळ करावी. बाह्यजननेंद्रीय कोमट पाण्याने धुवावी, साबणाचा वापर टाळावा. पाळीदरम्यान तात्पुरती व पुन:उपयोगी  स्वच्छता साधने वापरावी लागतात. तात्पुरती (डिस्पोजेबल) मध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व मेन्स्ट्रुअल टॅम्पोन्स याचा समावेश होतो. सॅनिटरी पॅड विविध आकाराचे व शोषक पातळीचे असतात. ते वेळोवेळी बदलावे. अन्यथा पुरळ येणे, खाज येणे असे होऊ शकते.

पुन:उपयोगी  स्वच्छता साधनेमध्ये कापडी पॅड, मेन्स्ट्रुअल कप यांचा समावेश होतो. कापडी पॅडमध्ये सुती कापडाच्या घड्या वापरता येतात. हे कापड स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून वापरावे. अस्वच्छ कपडे वापरू नये. मेन्स्ट्रुअल कप हे वजनाने हलके, पर्यावरणपूरक आहे. हे सिलिकॉनचे बनवलेले असून लवचिक असते. आठ तासांनी ते बदलता येते. निर्जंतुकीकरणासाठी ६ ते ८ मिनिट उकळत्या पाण्यात बुडवून उकळवावे. एक कप १० वर्षांपर्यंत वापरता येतो. त्यामुळे नैसर्गिक असलेल्या मासिक पाळीचे नियोजन व्यवस्थित केले तर संभाव्य आजार टाळता येतात. मासिक पाळी स्वास्थाच्या निर्बंधांचे दुष्ट चक्र वैज्ञानिक संवाद साधून तोडण्याची गरज आहे. त्यासाठी संकोच न बाळगता अभिमान ठेवावा, महिलांनी खुलेपणाने बोलावे, आरोग्याविषयी दक्ष राहावे, असेही आवाहन डॉ. बनसोडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज