कापसाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा; खा. उन्मेश पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामातील प्रमुख पिक असलेले उडीद, मुग इत्यादी पिकांचे पावसाचा मोठा खंड पडल्याने तसेच दाणे भरण्याच्या अवस्थेत पाऊस झाल्याने पूर्णपणे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकात मोठ्या प्रमाणात बोंड सड होत असल्याने कपाशी पिकाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

जळगाव जिल्ह्यात कापसाचे लागवडीखालील क्षेत्र 536489 हेक्टर एवढे असून यात कोरडवाहू 303753 हेक्टर व बगायती 232736 हेक्टरचा समावेश आहे. या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता खरीप हंगामाच्या सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने कापसाची वाढ खुंटली होती, परंतु शेतकरी बांधवांनी उपलब्ध सिंचन सुविधेद्वारे पिक जतन केले. कापूस पिकाचे बोंड परिपक्व होत असतांना मागील १५ ते २० दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात बोंड सड होत आहे, त्यामुळे कपाशी पिकाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. खा. पाटील यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे की, मी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असून यात मोठ्या प्रमाणावर कपाशी पिकाचे नुकसान झाले असून याबाबत शेतकऱ्यांच्या देखील सूचना प्राप्त होत आहेत. सदरच्या पिकाचे होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्पन्नाची आशा असलेल्या एकमेव कापूस पिक देखील पूर्णतः वाया जाण्याच्या अवस्थेत असून कापसाच्या दोन वेचण्या होणे देखील कठीण झाले आहे. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तात्काळ संबंधित यंत्रणा यांना कापूस पिकाचे पंचनामे करण्याबाबत सूचित करून शासनापुढे नुकसानीचा अहवाल सादर करून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्याकरीता आदेशीत करावे, अन्यथा मला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,जळगाव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज