…अखेर महाराष्ट्र – मध्य प्रदेशातील बस सेवा सुरु

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेली रावेर-बऱ्हाणपूर बस सेवा अखेर सुरु करण्यात आलीय. तब्बल दीड वर्षांच्या खंडानंतर आज गुरुवारपासून  महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सुमारे १० एस टी बस गाड्यांची प्रवाशांसह ये जा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आगामी काळात या फेऱ्यांची संख्या वाढेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून रावेर – बऱ्हाणपूर दरम्यानची एस टी बस सेवा बंद झाली होती. आता कोरोनाचे प्रमाण कमी होऊन देखील मध्यप्रदेश सरकारने घेतलेल्या अडवणुकीच्या धोरणामुळे एसटी महामंडळाच्या बस गाड्या मध्यप्रदेश हद्दीत येऊ दिल्या जात नव्हत्या. मध्यप्रदेशातील कंत्राटी तत्त्वावर असलेल्या खासगी बस गाड्या देखील महाराष्ट्रात येत नव्हत्या.त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत होते.

दरम्यान, आज मध्यप्रदेश प्रशासनाने महाराष्ट्रातील एस टी बस गाड्यांच्या येण्या जाण्यावरील निर्बंध १ सप्टेंबरपासून उठविले. आज सकाळीच मध्य प्रदेशातील खासगी बस गाडी रावेर बस स्थानकात आली आणि त्यानंतर एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून महाराष्ट्रातील एस टी गाड्या देखील बऱ्हाणपूरमध्ये पाठवल्या.

आज बस गाड्यांचा पहिला दिवस असूनही या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. येथील आगाराचे वाहतूक निरीक्षक जयंत चोपडे यांनी सकाळला सांगितले की, रावेर- बऱ्हाणपूर दरम्यान आपल्या आगाराच्या ३८ बस फेऱ्या आधी सुरू होत्या, लवकरच या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात येतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar