येन दिवाळीत व्यापाऱ्यांनी काढलं केळी उत्पादक शेतकऱ्यांच ‘दिवाळ’ ; शेतकरी आर्थिक विवंचनेत

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी या पिकाचे उत्पन्न घेतले जाते.हा परिसर केळी उत्पादननासाठी प्रसिध्द आहे, परंतु सध्या स्थितीत येथील केळी उत्पादक शेतकऱ्याना व्यापाऱ्यांकडून तोंड दाबून मुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. कारण बाजारात केळीला बोर्ड भाव असून सुद्धा केळीचा भाव व्यापारी स्वतःच्या मर्जी नुसार ठरवत असतात. केळी माल चांगल्या प्रतीचा उत्तम दर्जेदार असून सुद्धा व्यापाऱ्यांकडून माल काढण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र सद्या दिसून येत आहे.

तर काही व्यापारी चांगल्या दर्जाची केळीमध्ये हि दोष काढून कमी किमतीत मागणी करीत आहे. मात्र या गोष्टीवर बाजारसामितीकडून केळी व्यापाऱ्यांवर काहीएक अंकुश दिसत नसून व्यापारी व बाजार समिती यांच्यात काही साटेलोट आहे कि काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे.

सध्या केळीला एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत बोर्ड भाव असून देखील व्यापारी बोर्डवरील जाहीर केलेल्या प्रत्यक्ष भावाप्रमाणे न घेता त्या पेक्षाही ५०० ते ६०० रुपये कमी दराने खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकरीला केळीवर लावलेला खर्च देखील निघणे मुश्कील होऊन गेले आहे. केळी हे पीक घरात साठवता न येणारे नाशवंत असल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्याला व्यापाऱ्याने मागणी केलेल्या भावात देण्यास भाग पडत आहे. या गोष्टीकडे बाजार समिती व कृषी विभागाने पूर्णपणे डोळेझाक केले असून यामुळे शेतकरी एन दिवाळीत आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार केळीसाठी आंदोलने करून सुद्धा लोकप्रतिनिधी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे यावर पालथ्या घड्यावर पाणी होताना दिसून येत आहे. यामुळे शेतकरी आता चांगलाच वैतागला आहे.

जैन घेते पण लेट देते

जळगाव येथील जैन कंपनी शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करते. परंतु तेही बोर्डापेक्षा निम्मे किंवा त्याहून कमी भाव देते. शेतकऱ्यांना आपला माल थेट जैन कम्पनीच्या दारात आणून ठेवायला खूप खर्च येतो व त्यांच्याकडून माल खरेदी झाल्यावर मालाचे पैसे जवळपास अकरा महिन्यांनी दिले जातात.

गल्लोगल्ली थाटल्या व्यापाऱ्यांनी दुकानं

तालुक्यात सद्या गल्लोगल्ली केळी खरेदीची दुकानं थाटलेली आहेत. त्यामुळे दहा बाय दहाच्या खोलीत मांडवली करून व्यापारी चक्क शेतकऱ्यांची लुटच करीत असल्याचे एका शेतकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण नसल्याने यात काहीतरी चिरीमिरीचा संशयही शेतकऱ्यांना येतो आहे.

केळीला उठाव कमी म्हणून मंदी

चांगल्या दर्जाची केळी असूनही मालाला भाव मिळत नाही.शेतकरी व्यापाऱ्याला भाव सबंधित माहिती विचारली असता वरती केळीला उठाव नसल्याने भाव नसल्याचे कारणे देतात. परंतु शेतकऱ्यांना या उठाव कमीचे कारण अद्यापही स्पष्ट न झाल्याने हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज