जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । लोण खुर्द ( ता. अमळनेर ) येथील ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी सरपंचासह १२ जणांविरुद्ध ऑट्रॉसिटीसह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसात ३५ जणांविरुद्ध दंगलीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तर सरपंचावर हा दुसरा गुन्हा आहे. यापूर्वी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
सविस्तर असे की, लोण खुर्द येथील देवचंद सहादू भिल ( वय ३५, ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सरपंच विकास अरुण पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्याविरुद्ध आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला आहे. त्यावर १८ नोव्हेंबर रोजी तारीख होती. म्हणून त्यांच्या मनात राग होता. त्यामुळे नेहमी गावात येता जाता चिडवून जातीवाचक शिवीगाळ करून अपमान करतात. परंतु भीतीपोटी या प्रकारबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती.
१९ रोजी रात्री ८ वाजता गावाबाहेर जात असताना गुरांच्या गोठयाजवळ रस्ता अडवून आरोपीनी जातीवाचक शिवीगाळ केली.
तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. बापू पाटील, सचिन शिंदे तसेच आक्काबाई भिल यांनी वाचवले. तसेच ज्वारी विकून आलेले ४ हजार रुपये शर्टच्या वरच्या खिशातून जबरदस्तीने काढून घेतले. तसेच विकास पाटील याने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
याप्रकरणी सरपंच विकास पाटील, शरद दयाराम शिंदे, प्रशांत दयाराम शिंदे, सुशिल निंबा पाटील, नीलेश निंबा पाटील, महेंद्र पाटील, बापू हिलाल पाटील, चुनिलाल चिंतामण पाटील, आदित्य चुनिलाल पाटील, संदीप गुलाब शिंदे, हेमंत प्रकाश पाटील, प्रकाश प्रल्हाद पाटील ( सर्व रा. लोण खुर्द ) यांच्याविरद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी राकेश जाधव करीत आहेत.