मजुरांना पाणी देण्यापूर्वीच विजेच्या धक्क्याने एकुलता बालक ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील नेरी येथे एका १० वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोनच्‍या सुमारास घडली. शेतात काम करीत असलेल्या मजुरांना पाणी पाजण्यासाठी पाणी घेण्यासाठी जात असताना शेतात पडलेल्या तारेचा झटका लागल्याने बालकाला जीव गमवावा लागला आहे.

 

पाचोरा तालुक्यातील नेरी येथील शेतकरी गणेश पाटील यांच्या शेतात मजूर काम करीत असताना मजूरांना पाणी घेण्यासाठी मुलगा ओम गणेश पाटील (वय १०) जात होता. शेतात महापूरामुळे तुटलेली विद्युत तार पडलेली होती. या तारेला ओमचा स्पर्श झाल्याने त्‍याला विजेचा जोरदार झटका बसला. दरम्यान त्याला तात्काळ चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओम पाटील घरातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत होती. दोन दिवसापूर्वीच जळगावातील विठ्ठल नगरात एसीच्या कॉम्प्रेसरचा शॉक लागून बालकाला जीव गमवावा लागला होता.

 

महावितरणच्या भोंगळ कारभाराचा बळी?

 

तीन-चार दिवसांपूर्वी परिसरात झालेला पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल जमिनीवर पडलेले आहेत. गणेश पाटील यांच्या शेतात देखील विद्युत तारा पडलेली होती. या तारेचा विद्युत पुरवठा सुरूच ठेवलेला होता. यामुळे ही घटना घडली असून महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे ओम पाटील याचा मुत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. याप्रकरणी चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -