fbpx

”शावैम” मध्ये मिळाले अत्यवस्थ नवजात शिशुला जीवदान

अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत १६ दिवसानंतर बाळाला डिस्चार्ज

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । कमी दिवसाचे आणि कमी वजनाच्या गंभीर नवजात बालकाला १६ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर सोमवार, २१ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या या रुग्णावर योग्य औषध उपचाराने मृत्यूच्या दाढेतून वाचविता आले. या शिशुस अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. 

यावल तालुक्यातील दुसखेडे येथील एका महिलेची येथील शाहू महाराज हॉस्पिटल मध्ये प्रसूती झाली होती. शिशूचे वडील जळगाव मेरिको कंपनीत कर्मचारी आहेत.  बाळाच्या जन्मानंतर आईला कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्याने त्या नवजात बालकाला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ५ जून रोजी दाखल करण्यात आले. बाळास श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यास सुमारे १२ दिवस व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. तसेच फुफ्फुसे नैसर्गिकरित्या काम करीत नसल्याने त्यांना योग्य औषधांनी नियंत्रित करण्यात आले. त्यामुळे बाळाची प्रकृती बरी होऊन ते सामान्य बाळासारखे हालचाल करायला लागले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून या बालकावर मोफत उपचार करण्यात आले. यासाठी रुग्णालयातील योजनेच्या संपर्क कार्यालयाने कागदपत्रांची पूर्तता केली. 

सोमवारी २१ जून रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे आदी उपस्थित होते. येथील बालरोग व चिकित्सा विभागामध्ये नुकतेच नवीन दहा लहान बालकांसाठीचे अतिशय अद्ययावत वेंटिलेटर प्राप्त झाले आहेत.  त्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले होते.  या नव्या अद्ययावत व्हेंटिलेटरचा लाभ घेऊन बरे होणारे हे पहिलेच नवजात शिशु आहे. 

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देवरे,  बालरोग व चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात शिशु व अतिदक्षता विभागाचे इन्चार्ज डॉ. वृषाली सरोदे, डॉ.शैलजा चव्हाण, डॉ. हितेंद्र भोळे, डॉ. अविनाश खिलवाडे यांनी शिशुवर उपचार केले. उपचारासाठी वार्डातील इन्चार्ज अधीसेविका शिल्पा पाटील, स्टाफ नर्स किशोरी कावडे, मंगला माळी, सिमा माळी, रुपाली झोपे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज