एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरसावले आ.चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. दरम्यान, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आ.चंद्रकांत पाटील सरसावले असून मागण्यांचा सकारात्मक विचार करावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.

एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या ७० दिवसांपासून संपावर गेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी आजवर ७७ कर्मचाऱ्यांचे बळी गेले आहेत. न्यायालयीन लढा जोवर संपत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावर वक्तव्य करीत, दोन दिवसात एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास स्वतः स्टेअरिंग हातात घेईल असा इशारा त्यांनी दिला होता. आमदारांना यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही कायम असून दररोज कोणत्या ना कोणत्या एसटी कर्मचाऱ्याचा बळी जात आहे. दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील एकही आमदार, खासदार ठोसपणे समोर येत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जळगाव लाईव्हकडे नाराजी व्यक्त केली होती. आपल्या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी पाठिंब्यासाठी पत्र देत नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत आम्ही देखील आमची ताकद दाखवू असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील पुढे सरसावले आहे. आ.पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी पत्र पाठविले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून नियमाधीन कार्यवाही करावी, अशा आशयाची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. शिवसेनेचे आमदार एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुढे सरसावले असून भाजपचे अद्याप पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar