बिबट्याची थर्टी फर्स्ट : रेड्यावर हल्ला करीत केले ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील नांदेडनजीक बिबट्याने दोन वेळा दर्शन दिल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे तर नांदेड-नारणे शिवरस्त्याजवळ रात्रीच्यावेळी बोअरवेलचा मोटर पंप बंद करण्यासाठी शेतात गेलेल्या येथील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडले. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून, वन विभागाने बिबट्याला पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

३० रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास येथील शेतकरी प्रदीप भारंबे हे इतर चार ते पाच जणांसह त्यांच्या नांदेड नारणे रस्त्याला लागून असलेल्या शेतामधील बोअरवेलची मोटर बंद करण्यासाठी कारने जात असतांना नांदेड नारणे शेती शिवाराजवळ निंबाच्या झाडाखाली त्यांना बिबट्या सुस्त झोपलेला असल्याचे गाडीच्या लाइटांच्या प्रकाशात दिसून आले. या आधी देखील २० डिसेंबरच्या रात्री नारणे शिवारात बाबुळगाव रस्त्याला लागून असलेल्या नारणे येथील शेतकरी भास्कर नागो कोळी यांच्या शेतातील शेडमध्ये रात्रीच्या वेळी बांधलेल्या सात ते आठ गुरांमधील एका रेड्यावर हल्ला चढवून ठार केले होते.

वासराचा फडशा

वसमार येथील तुळशीराम वामन आजगे यांची काकोर शिवारात बागायत शेती आहे. याच शेतात त्यांच्या गुरांचा वाडा आहे. या वाड्याला जाळीचे कंपाऊंड आहे. असे असतानाही बिबट्या तारांच्या जाळीवरून उडी घेत वाड्यात शिरला. बिबट्याला बघताच काही गुरांनी दोर तोडून आपला जीव वाचविला. बिबट्याने या वाड्यात बांधलेल्या सहा महिन्यांच्या वासरावर हल्ला करून तिचा फडशा पाडला. वसमार येथील पाटगन शिवारात राजेंद्र श्रावण आजगे यांचा मेंढ्यांचा वाडा होता. गुरुवारी रात्री बिबट्याने एका मेंढ्यावर हल्ला करून त्याला फस्त केले. राजेंद्र आजगे यांचा पाच हजार किमतीचा मेंढा बिबट्याने फस्त केला. त्यामुळे वन विभागाने बिबट्याला पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -