घरफोडी प्रकरणी एलसीबीकडून दोघांना अटक; मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । गणपतीनगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील टीव्ही, गॅस सिलेंडरसह साहित्य लंपास करण्यात आल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गणपतीनगरातील सुरेश फूड वर्ल्ड जवळील एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील टीव्ही, गॅस सिलेंडर, पाण्याची मोटारसह साहित्य लंपास करण्यात आल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेतील संशयित आरोपी फरीद उर्फ बुल्ली मोहम्मद मुलतानी (रा.अजमेरी गल्ली, तांबापुरा) याने काही दिवसांपूर्वी चोरी करुन चोरी केलेला माल घरात लपवून ठेवला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश मेंढे, संदीप पाटील, पोलीस नाईक संतोष माईकल आदींचे पथक तयार करून घरफोडीतील संशयितांची चौकशी करून ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने तांबापुरा भागात जाऊन फरीद उर्फ बुल्ली मुलतानी याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.

पोलिसांनी केल्या चौकशीत त्याने शाम सुभाष तानसर (रा. रामेश्वर कॉलनी, संभाजीनगर) याच्यासोबत मिळून दि.१६ नोव्हेंबर रोजी गणपती नगरात घरफोडी केल्याची कबुली दिली तसेच घरातून चोरलेला सामान राहत्या घरात लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याचा साथीदार शाम तानसर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ गॅस सिलेंडर, १ एलईडी टीव्ही व पाण्याची मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपासकामी दोघा संशयित चोरट्यांना रामांनद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज