स्व. तेजस नाईक यांना मरणोत्तर राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । मुंबई येथील नूतन गुळगुळे फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ‘राष्ट्रीय ध्येयपूर्ती मरणोत्तर पुरस्कार २०२१’ कला व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल स्व.कु.तेजस नितीन नाईक यांना देण्यात आला. स्व.तेजसची आई सुवर्णा नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे माजी नगरपाल डॉ.जगन्नाथराव हेगडे, सुप्रिया लाईफसायन्स ली.चे संस्थापक डॉ.सतीश वाघ, चित्रपट कलाकार आणि निर्मात्या डॉ.निशिगंधा वाड, संस्था संचालक पुष्कर गुळगुळे, नूतन गुळगुळे आदी उपस्थित होते. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तींनी आपल्या कौशल्यांचा उत्तम वापर करून समाजाच्या कल्याणासाठी योगदान दिले असेल किंवा आपल्या दिव्यंगत्वाचा बाऊ न करता उत्तम आणि प्रेरणादायी कार्य केले असेल अश्या दिव्यांग व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पाच हजार रुपये रोख, सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रज्ञाचक्षु असूनही बालपणापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत तेजसने गायनाचा छंद जोपासला आणि गायनात स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण केलं. शालेयस्तर ते कॉलेज आणि त्यानंतर महाराष्ट्र स्तरावरील गायनाच्या विविध स्पर्धामध्ये त्याने पुरस्कार मिळवले. यासोबतच तेजस दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पात युपीएससीची तयारी सुद्धा करत होता. संगीत क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत शैक्षणिक क्षेत्रातही गुणवत्ता राखत केलेल्या कामगिरीबद्दल स्व.तेजस नाईक याला हा पुरस्कार देण्यात आला. स्व.तेजसची आई सुवर्णा नाईक, वडील नितीन नाईक आणि लहान भाऊ ईशान नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दिव्यांगांना प्रेरणा देणारा कार्यक्रम
नूतन गुलगुले फाऊडेशनने आयोजित केलेला हा कार्यक्रम दिव्यांगांना प्रोत्साहन व प्रेरणा देणारा आहे. तेजस नाईक याने अत्यंत कमी वयात उत्तुंग भरारी कला व शिक्षण क्षेत्रात घेतलेली होती. मी त्याचा शिक्षक होतो आणि माझ्याच हातुन त्याला पुरस्कार त्याच्या निधनानंतर त्याच्या परिवाराला दिला जातोय हा माझ्यासाठी अत्यंत भावपूर्ण आणि अविस्मरणीय असा क्षण आहे. तेजसचे व्यक्तिमत्व भविष्यात अनेक दिव्यांग विदयार्थ्याना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तथा दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.

आईवडील म्हणून सार्थ अभिमान
तेजसला जेव्हा ‘राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार’ जाहीर झाला तेव्हा अभिमानाने ऊर भरून आला. २० वर्षाच्या अल्पकालावधीत तेजस जे कार्य करून गेला आहे त्याचा आईवडील म्हणून आम्हांला सार्थ अभिमान आहे. आज तो नसतांनाही त्याच अस्तित्व कायम आहे, हे या पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तेजसचा संघर्षमय जीवन प्रवास सर्वांपर्यंत पोहचावा आणि इतरांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणूनच मी त्याच्या आयुष्यावर ‘सुवर्ण तेज’ हे पुस्तक लिहले. तेजस आज आपल्यात नाही, पण त्याच्या कार्याने आणि पुस्तकाच्या रुपाने त्याच्या आठवणी सदैव चिरंतन राहतील, अश्या भावना तेजसची आई सुवर्णा नाईक यांनी यावेळी व्यक्त केल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar