आर्यन खानसोबत सेल्फी घेणाऱ्या किरण गोसावीचा जळगावात मुक्काम

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणात नुकतेच अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. क्रूझवर आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी फरारी असताना त्याने जळगावात चाळीसगाव आणि अमळनेर येथे मुक्काम केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गोसावीच्या अटकेबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जळगावचा उल्लेख केल्यामुळं या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, पहाटेच्या सुमारास कात्रजमधील मांगेवाडीतील एका लॉजमधून किरण गोसावी याला सापळा रचून अटक करण्यात आली. दरम्यान, गोसावी कुठे आणि कसा कसा फिरला? याबाबत माहिती द्या असा प्रश्न विचारल्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गोसावी गेल्या १० दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता. यामध्ये लखनऊ, फतेहपूर, तेलंगणा, जबलपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणी फिरल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व ठिकाणी पुणे पोलिसांच्या टीम गेल्या होत्या.

गोसावी फरार असताना सचिन पाटील या नावाने सर्वत्र जात होता. सचिन पाटील या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. आपण स्टॉप क्राईम एन्जीओचा प्रतिनिधी असल्याचंही तो सांगत होता. ही प्राथमिक माहिती मिळाली असून आम्ही याची खातरजमा आणि चौकशी करत आहोत असंही गुप्ता यांनी सांगितले.

गोसावीचे जळगाव कनेक्शन?
दरम्यान, किरण गोसावी याने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि अमळनेर येथे मुक्काम केल्याचे समजते. गोसावी हा मूळ चाळीसगाव तालुक्यातील पिलखेड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतु या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. गोसावीला ५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून त्यात आणखी माहिती समोर येणार आहे.

गोसावीवर यापूर्वी देखील गुन्हे
किरण गोसावी याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूक आउट नोटीस देखील जारी केली आहे. कापूरबावडी, अंधेरी, कळवा पोलिसात गुन्हे दाखल असून आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असून इम्पोर्ट एक्स्पोर्टचा बिझनेस असल्याचे देखील तो सांगतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज