करदोडा दिवाळी : अंबऋषी महाराज यांना ५१ भार चांदीचा करदोडा अर्पण

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । येवती ( ता. बोदवड ) येथील अंबऋषी महाराज यांची करदोडा दिवाळी सोमवारी रोजी माेठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरातील अंबऋषी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून ५१ भार चांदीचा करदाेडा अर्पण करण्यात आला.

सविस्तर असे की, बोदवड तालुक्यातील येवती येथील अंबऋषी महाराज यांची १०७ वर्षांपासून करदाेडा दिवाळीची अखंड परंपरा आजही सुरू आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने येवती येथील करदोडा दिवाळी ही अत्यंत माेजक्या नागरिकांच्या उपस्थितीत पार पडत होती. मात्र, या वर्षी शासनाच्या वतीने नियमांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आल्याने येथील मंदीर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती पाहण्यास मिळाली. येवती गावानजीक असलेल्या नामदेव माळी यांच्या शेतातील अंबऋषी महाराजांच्या भव्य मंदिरात सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गावातील माळी वाड्यातून वाजत गाजत मिरवणूक मंदिरामध्ये पोहाेचली. त्यानंतर तेथे येवती, रेवतीसह परिसरातील अनेक गावांमधून आलेले महिला, पुरूष, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जळगावचे नगरसेवक संतोष इंगळे, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, भरत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

फटाक्यांची आतषबाजी; दिवाळीला सुरुवात

या मंदिरातील अंबऋषी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून या मूर्तीला महिलांकडून करदोडा बांधण्यात आला. दरम्यान लोकवर्गणीतून आणलेला ५१ भार वजनाचा चांदीचा करदोडा यावेळी महाराजांना अर्पण करण्यात आला. यावेळी सामुहिक आरती हाेऊन महाराजांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. यानंतर मंदिराच्या परिसरासह गावात फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. गावात आता खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज