मनपात करभरणा केल्यास मिळणार भरघोस सूट, महापौरांच्या मागणीला यश

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । शहरातील कर वसुली वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून मालमत्ता कर भरणा केल्यास शास्तीमध्ये सूट देण्यात येत होती. मनपा प्रशासनाच्या अभय योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्तांना पत्र दिले होते. महापौरांच्या मागणीला यश आले असून अभय योजना दोन महिन्यांसाठी पुन्हा लागू करण्यात आली आहे.

मालमत्ता कराचा भरणा वाढवून मनपाच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभय योजनेंतर्गत जुलै महिन्यापर्यंत सूट देण्यात येत होती. मनपा प्रशासनाला अभय योजनेत उत्तम प्रतिसाद लाभल्याने योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले होते.

महापौरांच्या मागणीला यश आले असून १५ नोव्हेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत अभय योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान भरणा केल्यास शास्तीमध्ये ९० टक्के सूट, दि.१५ ते ३१ डिसेंबरपर्यंत भरणा केल्यास शास्तीत ७५ टक्के तर दि.१ ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत भरणा केल्यास शास्तीत ५० टक्के सूट दिली जाणार आहे. शुक्रवारी मनपा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज