fbpx

गाळे लिलाव आणि वॉटरग्रेस लवाद दोन्ही विवादित विषयांना मंजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । जळगाव शहर मनपात सत्तांतर झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच महासभेत शहरातील मनपा मालकीच्या १६ व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव करण्याचा आणि वॉटरग्रेस प्रकरणात लवाद नेमण्याचे दोन्ही विषय बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले. भाजपच्या काही सदस्यांनी दोन्ही विषयांना कडाडून विरोध केला. दरम्यान, सभा ऑनलाईन असतानाही भाजप सदस्य थेट सभागृहात येऊन पोहोचले.

महासभेला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुळकर्णी यांच्यासह सर्व नगरसेवक ऑनलाईन उपस्थित होते.

मनपा महासभेत आज शहरातील सर्व म्हणजे १६ व्यापारी संकुलांमधील गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबतचा महापालिका प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या आजच्या महासभेत आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोनाची परिस्थिती, गेल्या वर्षभरात त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी उद्भवलेल्या व अचानक कराव्या लागणाऱ्या खर्चाचा अनुभव लक्षात घेवून पुढच्या वर्षातही दक्षाता घ्यावी लागेल. या मुद्द्यावर अर्थसंकल्पाची रचना करतांना प्रशासनाने भर दिला होता. हे वास्तव लक्षात घेवून आगामी काळात विविध करांच्या वसुलीवर आणि उत्पन्नावर जोर दिल्याशिवाय उपाय नाही. अशी भूमिका प्रशासनाने आज महासभेत मांडली होती.

गाळ्यांचा लिलाव होणार?

गाळ्यांच्या भाड्यातून १६० कोटी उत्पन्न अपेक्षीत असल्याची भूमीका प्रशासनाने घेतली आहे. त्याचप्रमाणे खुला भूखंड दर जास्तीत जास्त वसूल करण्याचे धोरण पुढच्या वर्षभरात राबविले जाणार आहे. ज्या व्यापाऱ्यांनी गाळ्यांचा भाडे भरणा केलेला आहे त्यांना पुढील १० वर्षासाठी ते दुकान कराराने दिले जाणार आहे तर उर्वरित गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे.

महापौरांच्या सभागृहात गोंधळ

महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, ऍड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यानंतर लवाद नेमण्याचा विषय नगरसचिव सुनील गोराणे यांनी वाचायला घेतला. हा विषय देखील बहुमताने मंजूर होत असल्याने भाजपचे सदस्य आक्रमक झाले. त्यानंतर भाजपचे सदस्य कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे आदी थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला. हा गोंधळ वाढत गेल्याने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सदस्य प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे हे देखील सभागृहात दाखल झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी ही महासभा ऑनलाईन असल्याने सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा वाद मिटला. नंतर सभा पूर्ववत सुरू होऊन, पुढील विषयांवर चर्चा सुरू झाली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज