बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित कंडारेला जामीन मिळताच पुन्हा अटक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । राज्यभर गाजलेल्या बीएचआर (BHR) पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला (Jitendra Kandare) डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शुक्रवारी जामीन मिळाला. शनिवारी कारागृहातून बाहेर येण्यापूर्वीच त्याला शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्यात त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदूरमधून अटक केली होती. दरम्यान, कंडारेने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज शुक्रवारी मंजूर केला होता. दुसरीकडे कंडारेची येरवडा कारागृहातून मुक्तता होण्याआधी शिक्रापूरच्या गुन्ह्यात तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सूरज बनगर, रऊफ शेख यांच्यासह पथकाने त्याला कारागृहातून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दुपारी तीन वाजता त्याला न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे? ही माहिती पोलिसांना घ्यायची आहे. या कारणांसाठी कंडारेच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ५ दिवस कोठडी दिली.

शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा असा
संतोष कांबळे (वय ५७, रा. लोहगाव, पुणे) यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी फिर्याद दिली. त्यानुसार २०१४ मध्ये कांबळे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी बीएचआरच्या भीमा कोरेगाव व शिक्रापूर या दोन्ही शाखांत पैसे ठेवले. मुदत संपल्यानंतरही पैसे मिळाले नाही. त्यामुळे कंडारेसह प्रकाश वाणी, सुनील झंवर, महावीर जैन, अजय राठी, विवेक ठाकरे, अजय हसमुखचंद ललवाणी, उदय कांकरीया व धरम सांखला यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar