fbpx

अवैध वाळूचा वापर केल्याने जामनेरच्या तहसीलदारांनी ठोकला ३८ लाखाचा दंड

भवानी फाटा नेरी जळगाव ते औरंगाबाद रस्ता या २० किलोमीटरच्या कामासाठी १८४ ब्रास अवैध वाळूचा वापर केल्याप्रकरणी जामनेरच्या तहसीलदारांनी महामार्गाचे कंत्राटदार स्पायरोधारा जे.व्ही. कन्स्ट्रक्शनवर वाळू साठ्याच्या बाजारभावाच्या पाचपट ३८ लाख ४ हजार १६ रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भवानी फाटा नेरी जळगाव ते औरंगाबाद रस्ता या २० किलोमीटरच्या कामासाठी अवैध वाळूचा उपयोग केल्याबाबत दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी जळगाव व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या कामाची प्रत्यक्ष मोजणी केली असता १ हजार ५ ब्रास वाळू या गौण खनिजाचा अवैध साठा आढळून आलेला आहे. 

या वाळूसाठ्याचा जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तलाठी, तक्रारदार गुप्ता यांच्या उपस्थितीत कंपनीच्या सुनसगाव बुद्रुक येथील साइटवर १ हजार ५ ब्रास वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला. त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने कंपनीने जामनेर तहसीलदारांना खुलासा सादर केलेला आहे. खुलाशाअंती कंपनीने १८४ ब्रास वाळूची शेगाव (जि. बुलडाणा) येथून उचल केलेली दिसते. जळगावच्या अपर जिल्हाधिकारी यांनी वाळू उपशाबाबतचे परमीट बुलडाणा येथील जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी पाठवलेले होते. 

त्यानुसार त्यांनी पत्र पाठवलेले आहे. पावत्यांनुसार केलेला वाळूची उचल ही शेगाव ते बारामती व आळंदी येथे केलेली दिसून येते. जामनेर तालुक्यातील कंपनीची साइट असलेले सुनसगाव बुद्रुक येथील कोणतीही पावती दिसून आलेली नाही. १८४ ब्रास वाळू ही अवैध उत्खनन करून वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाने ३८ लाख रुपये दंडाची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलमानुसार १८४ ब्रास अवैध वाळू वापरल्याप्रकरणी कंपनीवर ३८ लाख ४ हजार १६ रुपयांच्या पाचपट दंडाची कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक पी. व्ही. श्रीनिवास यांना त्याबाबत नाेटीस बजावण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज