जळगावकरांचे मिशन, नगरसेवकांना द्या हाक.. ‘जय रस्ता’

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । शहरासह जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात रस्त्यांची पार वाट लागली असून नागरिक पार बेहाल झाले आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून दिवसेंदिवस परिस्थिती आणखीनच खराब होत आहे. शहरातील रस्त्यांसाठी बऱ्याच वेळा निधी आला असून त्यात फारशे कामे झालीच नाही आणि बऱ्याच वेळा तर निधी परत गेला. शहरातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता सहनशील नागरिकांची सहनशक्ती संपली असून दररोज आपल्याला दिसणाऱ्या नगरसेवकाला नमस्कार, रामराम, नमस्ते सोबतच ‘जय रस्ता’ आवाज द्यावा असे आवाहन सोशल मिडियात केले जात आहे.

जळगाव शहरासह जिल्हाभरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रामुख्याने अमृत योजना आणि भूमिगत गटारीचे काम सुरु असलेल्या शहरात परिस्थिती अधिकच दयनीय आहे. जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षात बहुदा अटलांटा कंपनीने प्रमुख रस्ते तयार केल्यानंतर रस्तेच तयार झालेले नाही. गल्लीबोळातील रस्त्यांचे तर सोडाच मुख्य रस्ते देखील तयार करण्यात आलेले नाही. रस्त्यांची डागडुजी करण्याशिवाय दुसरे काहीच काम मनपा प्रशासन किंवा आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी केलेले नाही.

जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. रस्त्याने जातांना वाहनांचे होणारे नुकसान, नागरिकांच्या शरीराची होणारी हेळसांड, धुळीमुळे होणारे आजार, डोळ्यांचा त्रास, लहानमोठे अपघात हे नित्याचेच झाले आहे. जळगावात आजवर अनेक नगरसेवक आले आणि गेले. बहुतांश नगरसेवक तर तेच असून पुन्हा पुन्हा तेच निवडून येतात. नागरिकांना पर्याय नसल्याने नागरिक देखील त्यांना मत देतात. जळगावातील नगरसेवकांनी एक जळगावकर म्हणून तरी विकासाच्या मुद्द्यावर खरोखर एकत्र येत शहराचा विकास करणे आवश्यक आहे.

जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला कंटाळलेल्या नागरिकांनी आता सोशल मीडियात एक मोहीम हाती घेतली आहे. रस्ते होतील तेव्हा होतील पण आपल्या स्थानिक नगरसेवकांना त्याची जाणीव करून देण्यासाठी एक आवाहन केले जात आहे. जळगावकरांनी आपल्या प्रभागात असलेल्या नगरसेवकांना ते दिसतील तेव्हा त्यांना ‘जय रस्ता’ म्हणून हाक द्यावी असे आवाहन सोशल मिडियात होत आहे. जळगावात प्रत्येक व्यक्ती आपले नगरसेवक समोर आल्यावर नमस्कार, रामराम, नमस्ते, सलाम वालेकुम करीत असतोच पण सध्या सोशल मिडियात सुरु असलेल्या या चळवळीने वेग धरल्यास नगरसेवक खरोखर रस्त्यांच्या कामासाठी प्रयत्न करतील यात शंका नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज