गौरी-गणेशोत्सवासाठी जळगावची एसटी सुसाट, कोकणात जाणार ७५ बसेस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । कोकणातील गौरी-गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातून कोकणात ७५ बस पाठविण्यात येणार आहेत.  प्रवाशांसाठी या बसचे ऑनलाइन तिकीट बुकिंग उपलब्ध करून देण्यात आले असून जळगाव विभागाला ऑनलाइन बुकिंगचे उत्पन्न मिळणार आहे.

दरवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. या गर्दीच्या अनुषंगाने रेल्वेतर्फे जादा रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळातर्फेही जादा बस सोडण्यात येणार आहेत. या सर्व बस मुंबई विभागातील कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल या भागातून कोकणात सोडण्यात येणार आहेत. कोकणात जाण्यासाठी मुंबई विभागातील बसची संख्या अपूर्ण पडत असल्याने, महामंडळाने राज्यातील विविध विभागांतून मुंबईला जादा बस मागविल्या आहेत. यात जळगाव विभागातील ७५ बसचा समावेश आहे. या बस ७ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यातील विविध आगारांतून मुंबईला रवाना होणार आहेत.

या बससोबत चालक आणि वाहकही रवाना होणार असून, गणेशोत्सव संपल्यानंतरच या बस जळगावकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, गणेशोत्सवासाठी जळगाव आगारातर्फे श्रीक्षेत्र पद्मालय येथे जादा बस सोडण्यात येतात. यातून जळगाव आगाराला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद असल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडणार आहे.

कोकणातील गौरी-गणेशोत्सवासाठी मुंबई विभागातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी या बसचे ऑनलाइन तिकीट बुकिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर या ऑनलाइन तिकीट बुकिंगमधून जे उत्पन्न येईल, महामंडळातर्फे ते पैसे जळगाव विभागाला देण्यात येणार आहेत, तसेच बससोबत जाणाऱ्या चालक-वाहकांनाही नियमानुसार जादा भत्ता देण्यात येणार असल्याचे जळगाव महामंडळ प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -