जळगाव शिवसेनेची दादागिरी, माल घेऊन पैसे न दिल्याची दुकानदाराची तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या निषधार्थ महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जळगावात गालबोट लागले आहे. वरणगाव येथे भाजप माविआ समोरासमोर आल्याचा प्रकार ताजा असतानाच जळगावातील गोलाणी मार्केटजवळ असलेल्या एका दुकानदाराकडून खाद्यपदार्थ घेऊन दादागिरी करीत त्याला पैसे न देता शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी दिल्याचा आरोप त्याने केला आहे. घटनेत दुकानदाराने त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला असता त्याचा गुडघ्याला देखील दुखापत झाली आहे.

जळगाव शहरात टॉवर चौकाकडून माविआच्या नेत्यांनी दुकानदारांनी दुकाने बंद करून महाराष्ट्र बंदला समर्थन देण्याचे आवाहन केले. बंदला जळगावात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जळगावातील गोलाणी मार्केटसमोर असलेल्या कीर्तिकुमार चोरडिया यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आहे. कीर्तिकुमार चोरडिया यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या काही महिला त्यांच्या गोलाणी मार्केटसमोरील आईसक्रीम पार्लरवर आल्या होत्या.

एका महिलेने त्यांच्याकडून ४ लस्सी, २ दूध बाटली आणि उपवास चिवडा असा १९० रुपयांची खरेदी केली. चोरडिया यांनी पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार देत दुकान बंद करण्याचा इशारा दिला. पैसे न देता ती महिला चारचाकीतून पुढे जाऊ लागली. चोरडिया पैसे मागण्यासाठी गेले असता वाहनाचा पाठलाग करताना त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. शिवसेनेच्या इतर महिला पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे कीर्तिकुमार चोरडिया यांनी सांगितले.

पहा थेट प्रक्षेपण :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज