fbpx

‘त्या’ आगग्रस्त महिलेला तातडीने मिळाली ५ हजार रूपयांची मदत

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । जळगाव शहरातील रेणुका नगरात घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशन शेडला आज सकाळी भीषण आग लागून वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे येथे आपल्या दोन मुलांसह राहणार्‍या निराधार महिलेचा संसार उघड्यावर आला आहे. या घटनेनंतर महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेट घेऊन त्या महिलेला मदतीचे आश्‍वासन दिले.

याबाबत असे की, आज सकाळी रेणुकामाता नगरात असलेल्या भीकन चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशनमध्ये रेखा पिंटू भालेराव ही महिला आपल्या दोन मुलांसह राहते. या महिलेच्या पतीचे निधन झाले असून ती एकटीच आपल्या दोन्ही मुलांसह या पार्टीशनयुक्त घरामध्ये वास्तव्यास होती. ही महिला बांधकाम कामगार असून भल्या पहाटे गाडेगाव येथे काम करण्यासाठी गेली होती. ती महिला गाडेगावला पोहचत नाही तोच तिच्या शेजारच्यांनी फोन करून तिला तिच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. आगीचे लोळ येतांना पाहून परिसरातील लोकांनी अग्नीशामन दलाच्या पथकाला पाचारण केले. महापालिकेच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र दरम्यान, येथे राहणार्‍या महिलेच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तातडीने या महिलेची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक प्रशांत नाईक, शिवसेना महिला आघाडीच्या शोभाताई चौधरी, ललीत धांडे यांची उपस्थिती होती.

आगीमुळे या महिलेचा संसार उघड्यावर आला असल्याने ती या मान्यवरांना पाहून रडू लागली. महापौर जयश्री महाजन यांनी त्यांना धीर दिला. तर उपहापौर कुलभूषण पाटील यांनी या नुकसानीचा शासनातर्फे तातडीने पंचनामा करण्यात येऊन त्या महिलेला मदत केली जाईल असे आश्‍वासन दिली. तर, नगरसेवक गणेश सोनवणे यांनी आगग्रस्त महिलेला तातडीने पाच हजार रूपयांची मदत देखील दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज