BREAKING : मांजाने कापला डॉक्टरचा गळा, माणुसकी हरपली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । शहरातील सालार नगरात राहणाऱ्या एक डॉक्टर दुचाकीने जात असताना खांबाला अडकलेल्या चायना मांजामुळे त्यांचा गळा कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी ११.४० च्या सुमारास घडली. दरम्यान, घटना घडल्यानंतर देखील डॉक्टर १० मिनिटे जागीच पडून होते. एका रिक्षाचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने त्यांचे प्राण वाचले आहे.

अमरावती येथील जवाद अहमद यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून जळगावात ते सध्या प्रशिक्षण घेत आहे. डॉ.अहमद हे सालार नगरात राहत असून सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते दुचाकी क्रमांक एमएच.१९.एयु.६८१४ ने तांबापुरा येथे जात होते.

महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अडकून उडत असलेला मांजा अचानक त्यांच्या गळ्यावर आला आणि लागलीच त्यांचा गळा कापला गेला. गळा कापल्यानंतर डॉ.अहमद हे रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीसह खाली कोसळले. स्वतः डॉक्‍टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्त्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार ये-जा करणारे नागरिक पहात होते मात्र तरीही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. रिक्षाचालक कलीम शेख यांनी प्रसंगावधान राखून डॉक्टर अहमद यांना रिक्षात टाकले आणि सारा हॉस्पिटल गाठले.

रुग्णालयातील वैद्यकीय प्रमुख डॉ.मिनाज पटेल, नर्सिंग सुप्रीटेंडन्ट हर्षल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव रोखला. डॉ.अहमद यांच्या गळ्यात १ आणि गळ्यावर ११ टाके टाकण्यात आले. डॉ.अहमद यांचा मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके देखील कमी पडू लागले होते. वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव गेला असता असे डॉ.मिनाज पटेल यांनी सांगितले.

चायना मांजामुळे दरवर्षी देशभरात अनेकांचा जीव जात असतो. शासनाने या मांजावर बंदी घातली असली तरी त्याची खुलेआम विक्री केली जाते. डॉ.अहमद यांना वैद्यकीय ज्ञान असल्याने ते बचावले असले तरी इतर कुणाचा बळी जाऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar