fbpx

‘मनसे’वाल्याने ‘भाजप’वाल्यांना बनविले मामा!

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२१ । एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असतो त्या वाढदिवशी इतर पक्षातील नेते त्या माणसाला सदिच्छा भेट देतात, बऱ्याच वेळा ते त्याच्या गळ्यात आपल्या पक्षाचा मफलर टाकून म्हणतात ‘हॅपी बर्थडे’. पण या हॅपी बर्थडेमध्ये दडलेला असतो एक पक्ष प्रवेश. एक काल्पनिक आणि हास्यास्पद कथा जरी वाटत असली तरी जळगाव शहरात नेमके असेच घडले आहे. चूक कुणाची किंवा पलटी कोण मारतोय ते निश्चित नसले तरी मनसे आणि भाजपवाल्यांची मात्र नाचक्की झाली आहे. शनिवारी झालेला पक्षप्रवेश रविवारी केवळ सदिच्छा भेटीच्या नावाला उरला.

मनसे महानगराध्यक्ष निलेश अजमेरा यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली होती. मनसेला खिंडार पाडल्याचा दावा केला जात होता. दरम्यान, हा पक्षप्रवेश नसल्याचे सांगत अजमेरा यांनी भाजपला तोंडावर पाडले आहे. तर अजमेरा भाजपात आले होते असा दावा भाजपकडून आजही होत आहे.

फोटोचा दुरुपयोग करीत भाजपने अफवा पसरवली : अजमेरा
मी मनसे सोडून इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नसून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्याचा खोटा प्रचार केला आहे. काल माझा वाढदिवस होता. माझ्या वाढदिवशी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व नेते यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचे मफलर घातले व फोटो काढून निघून गेले. मात्र भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी या फोटोचा गैरवापर करत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची अफवा पसरवली, असे मनसे महानगराध्यक्ष निलेश अजमेरा यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.

अजमेरांच्या गळ्यात भाजपचा मफलर आला कसा? : सूर्यवंशी
शनिवारी निलेश अजमेर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हे वृत्त खरे आहे. ते स्वतः जरी हे वृत्त फेटाळत असले तरी प्रवेशावेळी ते म्हणाले होते की, भारतीय जनता पक्षाचे विचार मला आवडतात म्हणून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. आणि जर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नाहीये तर त्यांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मफलर आला कसा? तर सवाल भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना उपस्थित केला.

मनसेच्या अजमेरा यांची गुगली : दोन दिवसात, दोन वक्तव्य
मनसे महानगराध्यक्ष निलेश अजमेरा यांच्या भाजप प्रवेशाबाबत शनिवारी रात्री त्यांना जळगाव लाईव्ह न्यूजने विचारणा केली असता ‘अद्याप चर्चा सुरू आहे. पक्षप्रवेश झाला की नाही हे उद्या समजेल’ असे उत्तर त्यांनी दिले होते. रविवारी मात्र अजमेरा यांनी गुगली टाकत मी प्रवेश केलाच नसून भाजपकडून अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. रात्रभरात अशी माशी कुठे शिंकली की अजमेरा पुन्हा स्वगृही परतले. भाजप व मनसे पक्षावर प्रेम करणारी जळगावकर जनता आणि कार्यकर्ते मात्र कोणता झेंडा घेऊ हाती? अशा विचारात आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt