जळगाव केटामाईन प्रकरण : शिक्षा सुनावलेल्या ५ जणांना खंडपीठात जामीन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । जळगावातील रूखमा इंडस्ट्रिज आणि बायोसिन्थॅटिकमध्ये १४ डिसेंबर २०१३ रोजी डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) मुंबई विभागातील अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे 118 कोटी रूपये किंमतीचे केटामाईन या अंमलीपदार्थाचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१९ मध्ये गुन्ह्यातील सात जणांना दोषी ठरवत न्यायालयाने पाच जणांची निर्दोष मुक्तता केली होती. दरम्यान, शिक्षा ठोठावण्यात आलेल्या ५ जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येकी १ लाखांच्या जात मुचलक्यावर अटीशर्थींसह जामीन मंजूर केला आहे.

अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या केटामाइनचा सुमारे 1.2 टनचा साठा केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जळगावात शुक्रवारी 13 डिसेंबर 2013 रोजी मध्यरात्री पकडला होता. मुंबई येथील विकास पुरी याने हा साठा जळगावातील रुखमा इंडस्ट्रीजमधून आणल्याची त्याने माहिती दिली होती. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 118 कोटी रुपये होती. उमाळा शिवारात आणि औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रीज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने 1175 किलो केटामाइन जप्त केले होते. रूखमा इंडस्ट्रीजचे नितीन चिंचोले आणि मुंबईस्थित विकास पुरी हे अमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे सूत्रधार असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सुरूवातीला पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली होती. तर मास्टरमाइंड विकास पुरी हा मुख्य सुत्रधार होता. विकास पुरीने औषधशास्त्र विषयात एम.टेक. केले असून या क्षेत्रातला तो तज्ज्ञ मानला जात होता. त्याच्या व्हीसी फार्मा आणि स्पेशालिटी केमिकल या दोन कंपन्या रत्नागिरी येथे आहेत.

‘या’ 12 संशयितांवर होता गुन्हा

पथकाने केलेल्या चौकशीत वरूण कुमार तिवारी, गौरी प्रसाद पाल दोन्ही रा. विकरोली मुंबई, नित्यानंद थेवर (वय 27) रा. धारावी मुंबई, कांतीलाल उत्तम सोनवणे रा. जळगाव, श्रीनिवास राव, विकास पुरी रा. पवई मुंबई, खेमा मधुकर झोपे रा. अंबरनाथ ठाणे, विकास रामकृष्ण चिंचोले रा. जळगाव, नितीन चिंचोले रा. आदर्श नगर, रजनिश ठाकूर, सिकंदराबाद, एस.एम.संथिककुमार मैलापूर, चेन्नई आणि विशाल सोमनाथ पुरी रा. जनकपुरी नवी मुंबई अशा 12 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे शिक्षा 

जिल्हा सत्र न्यायालयातील न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात २६ एप्रिल २०१९ रोजी केटामाईन प्रकरणाची सुनावणी झाली होती. रूखमा इंडस्ट्रिजमध्ये केटामाईन सापडल्यानंतर आरोपींच्या घरी तपासणी करण्यात आली. त्यात आरोपी विकास चिंचोले यांच्या घरात 362 ग्रॅम सोने आणि अडीच कोटीची रक्कम जप्त करण्यात आली होती. सोबत केटामाईन प्रकरणात मास्टरमाइंड मुख्य आरोपी विकास पुरी याची बायोसिन्थॅटिक कंपनीतील मशिनरी, सर्व सामान, तसेच रूखमा इंडस्ट्रिज मधील संपुर्ण मशिनरी आणि वापरण्यात आलेल्या तीन चार चाकी वाहने देखील सरकार जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. डीआरआयतर्फे विशेष सरकारी वकील ॲड.अतुल जाधव आणि ॲड. अतुल एस. सरपांडे, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने सातही जणांना शिक्षा सुनावली तर ५ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. आरोपींना सुनावलेल्या शिक्षा ह्या एकत्रितरित्या भोगाव्या लागणार आहेत.

अशी आहे शिक्षेची तरतूद

1. वरूण कुमार तिवारी, रा. विकरोली मुंबई
कलम 8 सी, 22 सी प्रमाणे – 10 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 10 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाचा सश्रम कारावास

2. श्रीनिवास राव रा. पवई मुंबई
कलम 8 सी, 23 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास, दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावास
कलम 28 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास, दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावास

3. विकास पुरी रा. पवई मुंबई
कलम 8 सी, 22 सी प्रमाणे – 13 वर्ष सश्रम कारावास आणि 1.75 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 8 सी, 23 सी प्रमाणे – 13 वर्ष सश्रम कारावास आणि 1.75 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 27 अ प्रमाणे – 13 वर्ष सश्रम कारावास आणि 1.75 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 13 वर्ष सश्रम कारावास आणि 1.75 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

4. खेमा झोपे, रा. अंबरनाथ ठाणे
कलम 8 सी, 22 सी प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

5. नितीन चिंचोले रा. आदर्श नगर, जळगाव
कलम 25 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

6. रजनिश ठाकूर, सिकंदराबाद,
कमल 8 सी, 23 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि एक लाख 75 हजार रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि एक लाख 75 हजार रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

7. एस.एम.सैंथिलकुमार, मैलापूर, चेन्नई
कलम 8 सी, 23 प्रमाणे – 11 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाच सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 11 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाच सश्रम कारावास

औरंगाबाद खंडपीठाने दिला जामीन

गुन्हा घडला तेव्हापासून सर्व संशयित कारागृहात होते. गेल्या ८ वर्षांपासून कारागृहात असताना रजनीशकुमार ठाकूर, श्रीनिवास राव, नितीन चिंचोले, एस.एम.सैंथिलकुमार, वरूणकुमार तिवारी या ५ जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी खंडपीठाचे न्या.एन.आर.बोरकर यांच्या न्यायालयात जामिनावर कामकाज झाले. आरोपींकडून ऍड.अभयसिंह भोसले, ऍड.रवी गुरुनानी, ऍड.चिरमाडे यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी न्यायालयाने सुनावल्या शिक्षेपैकी ८ वर्ष शिक्षा भोगलेली आहे. गेल्या ८ वर्षापासून ते कारागृहात असून सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार एनडीपीएसच्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात बंदिवान कैद्याने निम्मी शिक्षा भोगलेली असल्यास त्यास जामीन देता येतो, असा दाखला दिला. तसेच गुन्ह्यात रुखमा इंडस्ट्रीजमध्ये सापडलेले केटामाईन हे पूर्णतः शुद्ध  केटामाईन नव्हे तर कच्चा माल असल्याचे ऍड.भोसले यांनी बाजू मांडताना सांगितले. न्यायालयाने ५ जणांना प्रत्येकी १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून दोन महिन्यातून एकदा जिल्हा न्यायालयात हजेरी लावणे आणि देश सोडून न जाण्याचे  आदेश दिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -