जळगावच्या पित्याची जुळ्या मुलांसह नाशिकला आत्महत्या, दीड महिन्यांपूर्वी पत्नीची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले महाजन कुटुंबीय नाशिक येथे वास्तव्याला होते. कोरोना काळात दोघांची नोकरी गेली होती. दीड महिन्यांपूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीने देखील तीन वर्षांच्या जुळ्या मुलांसह खाणीत उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

यावल तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले शंकर गुलाब महाजन (वय-३४) हे पत्नी आणि जुळे मुले पृथ्वी व प्रगती (वय ३ वर्षे) यांच्यासह नाशिकच्या जळउके शिवारात राहत होते. कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. दरम्यान, कोरोना काळात दोघांनाही नोकरी गमवावी लागली होती. तेव्हापासून शंकर हे मिळेल त्या ठिकाणी बदली चालक म्हणून काम करीत होते.

सय्यदपिंप्री शिवारात बुधवारी सकाळी खदान परिसरात पाण्यावर तीन मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळून आले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले. काही अंतरावर दुचाकी, आणि चप्पल पडलेल्या आढळून आल्या. मृताजवळ असलेल्या आधारकार्डच्या आधारे तपास केला असता शंकर महाजन (रा. भगतसिंगनगर, ओझर) यांचा आणि त्यांच्या दोन जुळ्या मुलांचे ते मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता मयत हे यावल (जळगाव) येथील रहिवासी होते. सध्या ते ओझर येथे वास्तव्यास होते. वरिष्ठ निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

दीड महिन्यांपूर्वी पत्नीची आत्महत्या
शंकर यांच्या पत्नीने दीड महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पत्नी गेल्यापासून शंकर हे वैफल्यग्रस्त झाले होते. मिळेल तेथे बदली चालक म्हणून ते जात होते. मुलांना सांभाळ करण्यासाठी ओझर येथे राहणाऱ्या पत्नीच्या आईकडे ठेवत होते. सोमवारी दि. ६ रोजी ते मुलांना घेऊन कुणास न सांगता घरातून निघून गेले. सय्यदपिंप्री शिवारात खदानमध्ये पाण्यात मुलांसह त्यांनी जीवन संपविले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -