जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ । राज्यात भाजून काढणाऱ्या उन्हाळ्याच्या मे महिन्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसाने धुमाकूळ घातला. जळगाव शहरासह परिसरात काल रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दीड तासात १७मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ३१ मे पर्यत जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस कायम राहणार असून आगामी चार दिवस जिल्ह्यात ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यासाठी हवामान विभागाकडून जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून यंदाच्या मे महिन्यात आतापर्यंत ११ दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात एक दिवस उष्णतेच्या लाटेसाठी, तर १० दिवस मुसळधार पावसासाठी आतापर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर एक दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात अवकाळी व त्यानंतर मान्सूनपूर्व पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दिवसा दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत ढगाळ वातावरण, त्यानंतर मात्र काही तालुक्यांमध्ये पावसाला हजेरी लागत असल्याचे चित्र आहे.
जळगावात रविवारी सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना मदत मिळू शकेल. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे केळीचे पुन्हा नुकसान होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
३१ मे पर्यंत जिल्ह्यात पाऊस..
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मे महिन्यात २५ ते ३० मिमी पाऊस झाला आहे. तसेच ३१ मे पर्यंत जिल्ह्यात पाऊस कायम राहणार आहे. हेच नाही तर २३ मे पासून अरबी समुद्रात चक्रवाती हवेचे क्षेत्र विकसित व्हायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २५ मे पर्यंत या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २६ मे पासून महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातदेखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
आगामी पाच दिवसांचा अंदाज…
दिनांक… तापमान… वातावरणाची स्थिती
१९ मे : तापमान ३८ अंश….. काहीअंशी ढगाळ वातावरण राहणार
२० मे : तापमान ३७ अंश….. यलो अलर्ट, ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यासह पाऊस
२१ मे : तापमान ३८ अंश…..यलो अलर्ट, ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यासह पाऊस
२२ मे : तापमान ३८ अंश…..यलो अलर्ट, ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यासह पाऊस
२३ मे : तापमान ३७ अंश…..गडगडाटासह पावसाची शक्यता