जिल्हा रुग्णालयात पुन्हा झोल?, १२० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची सव्वा लाखप्रमाणे खरेदी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । जिल्हा रुग्णालयाने कोविड काळात केलेल्या साहित्य खरेदी-विक्री संदर्भातील एक-एक प्रकरण समोर येऊ लागले आहेत. व्हेंटिलेटरचा मुद्दा संपत नाही तोच जिल्हा रुग्णालयाकडून खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात १२० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदीचा मुद्दा समोर आला आहे. एका कॉन्सन्ट्रेटरची किंमत ही १ लाख २५ हजार रुपये लावल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांना माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे. ज्या पुरवठादाराने हे कॉन्सन्ट्रेटर पुरविले आहे, त्यांनी खासगी कोटेशनमध्ये कॉन्सन्ट्रेटरची किंमत ५६ हजार रुपये नमूद केली आहे. या सर्वप्रकारात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केला आहे.

गेल्या वर्षी कोविड संक्रमण वाढल्याने ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण जिल्ह्यात वाढत होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये जून महिन्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. प्रभंजन ऑटोमोबाईलद्वारा या कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा केला आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून ही खरेदी करण्यात आली आहे.

काय म्हणतात डॉक्टर?
कोविड काळातील स्थिती लक्षात घेता एका डॉक्टरांनी हे मशिन ३० हजारापर्यंत येते असे सांगितले. अन्य एका खासगी डॉक्टरांनी कोविडच्या काळात त्याची मागणी वाढल्याने या मशिनच्या किमती ४० ते ७० हजारापर्यंत गेल्याचे नमूद केले. माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी एका कंपनीचे कोटेशन दिले असून त्यात १० लीटरच्या एका कॉन्सनट्रेटरची किंमत ३० हजार देण्यात आली. विशेष बाब म्हणजे ज्यांनी शासनाला पुरवठा केला आहे. त्या प्रभंजन ऑटोमोबाईलद्वारा जुलै महिन्यात एका कॉन्सनट्रेटरची किंमत ५६ हजार रुपये देण्यात आली आहे. शासनाला मात्र, एक कॉन्सनट्रेटर १ लाख २५ हजारात दिल्याने यावर भोळे यांनी आक्षेप नोंदविला आहे.

प्रशासकीय मान्यतेनंतर सर्व प्रक्रिया राबवली
या खरेदी प्रक्रियेत जे बीडर्स सहभागी झाले होते. त्यांनी जे रेट नमूद केले होते. त्यातील कमी रेटला ते खरेदी केले. यात मार्केटमध्ये याची किंमत किती नोंदविली गेली. आहे, ते आपण बघितले नाही. सहभागी बीडर्सनी जे नोंदविले त्यानुसार जेएम पोर्टलवर ही प्रक्रिया झाली आहे. यात कोविडच्या काळात मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी रेट वाढविले आहे. यात तांत्रिक, प्रशासकीय मान्यतेनंतरच ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाते असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी सांगितले.

आवश्यकता नसताना ४ कोटींची खरेदी
जिल्हा रुग्णालयाकडून आवश्यकता नसताना चार ते साडे चार कोटी रुपयांची विविध मशिनरी खरेदी केली असून ती धूळखात पडलेली आहे. रेडीओलॉजिस्ट नसताना धरणगाव, चोपडा येथे ४४ लाखांचे डिजिटल मेमोग्राफी मशिन घेतले आहेत. तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मार्केटमध्ये २५ ते ३० हजार किंमत असताना हे प्रत्येकी सव्वा लाखात खरेदी केले आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -