जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची रस्त्यावर गुपचूप दिवाळी पण कौतुकास्पद!

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर दिवाळी प्रत्येकाने आनंदात आणि जल्लोषात साजरी केली. सारे गावकरी दिवाळी साजरी करण्यात व्यस्त असताना जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे मात्र सौभाग्यवतींसह रस्त्यावर निराधारांना रात्रीच्या सुमारास खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत होते. विशेष म्हणजे राऊत दाम्पत्य कोणताही बडेजाव किंवा फोटो सेशन, चमकोगिरी न करता आपले प्रामाणिक कार्य करण्यात व्यस्त होते. प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करून देखील त्यांना काहींनी कॅमेऱ्यात कैद केले.

जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहतात. जळगावसह राज्यभरात ते अनेक गरजूंची मदत करतात परंतु त्याचा कुठेही गाजावाजा करीत नाही. जळगावात कोविड काळात त्यांनी केलेले कार्य संपूर्ण जिल्हावासियांनी मनात ठेवले आहे. दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे पत्नी तथा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ.अनुराधा राऊत हे दाम्पत्य घराबाहेर पडले.

आपली ओळख पटू नये यासाठी शासकीय वाहनाचा उपयोग न करता त्यांनी खाजगी वाहनाने रेल्वेस्थानक परिसर गाठला. स्वतःच हातात साहित्य घेत पायी फिरून त्यांनी बाहेर झोपलेल्या निराधारांना साहित्य वाटप केले. थंडीच्या सुरुवातीलाच मायेची उब मिळाल्याने निराधारांना राऊत दाम्पत्याला भरभरून आशीर्वाद दिले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत व डॉ.अनुराधा राऊत यांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जवळपास ४० बेघर, निराधारांना थंडीपासून बचावासाठी शाल, आधार म्हणून खाद्यपदार्थ, पेन रिलीफ बाम, औषधी, टूथपेस्ट, थंडीपासून बचाव करणारे मलम असे विविध साहित्य देऊन आपली सामाजिक बांधीलकी जपली.

समाजात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे छटाकभर द्यायचे आणि किलोभर गाजावाजा करायचा, दुसरे असतात ते किलोभर द्यायचे आणि तसूभर देखील दाखवायचं नाही. आपण करीत असलेल्या कार्याची कुणालाही कुणकुण लागू नये याची राऊत दाम्पत्याने पुरेपूर खबरदारी घेतली होती. मदतीसाठी त्यांनी मुद्दाम रात्री उशिराचा वेळ निवडला, शासकीय वाहनाचा वापर टाळला, मदतीसाठी कुणालाही सोबत घेतले नाही. कुणालाही खबर लागू दिली नाही पण रात्री त्यांना कुणीतरी ओळखलेच आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. जिल्हाधिकारी कॅमेऱ्यात कैद झाले नसते तर त्यांच्या या कौतुकास्पद कार्याची माहिती कुणालाही लागली नसती.

पहा व्हिडीओ :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज