जळगाव जिल्ह्यात ९३.२ टक्के पावसाची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ९३.२ टक्के इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सुरूवातीचे काही दिवस वगळता जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती, त्यामुळे यंदा जळगावकरांना दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय अशी शंका निर्माण झाली होती. परंतु काही दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत दुष्काळाची छाया जाणवत असतांना ऑगस्टच्या शेवटच्या आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जळगाव जिल्ह्याची तूट भरून निघाली. जिल्ह्यातील वाघूर, तोंडापूर, अभोरा, सुकी, अग्नावती, हिवरा, बोरी, मंगळूर, मन्याड ही धरणे १०० टक्के भरली आहेत.

तालुकानिहाय पावसाची नोंद

जिल्ह्यातील जळगाव तालुक्यात ८५.१, भुसावळ तालुक्यात ८५.७, यावल तालुक्यात ८४.५, रावेर तालुक्यात ९५.६, मुक्ताईनगर तालुक्यात ९१.९, अमळनेर तालुक्यात ८०.०, चोपडा तालुक्यात ६५.३, एरंडोल तालुक्यात १००.७, पारोळा तालुक्यात ११३.३, चाळीसगाव तालुक्यात १३२.९, जामनेर तालुक्यात ९८.६, पाचोरा तालुक्यात ९४.२, भडगाव तालुक्यात ८८.३, धरणगाव तालुक्यात ७९.२, बोदवड तालुक्यात ८४.६ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज