fbpx

मोबाइलसाठी घेतलेले कर्ज बनले तरुणाच्या मृत्यूचे कारण, जळगावातील घटना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ ।  मोबाइलसाठी घेतलेले कर्ज एका तरुणाच्या मृत्यूचे कारण बनले आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीने धमकावल्याने तणावातून जळगावातील योगेश्वनगरातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. आशुतोष अनिल पाटील (वय २९, रा. योगेश्वरनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आशुतोष हा पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीस होता. लॉकडाऊननंतर तो सध्या घरीच होता. आशुतोष यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून मोबाइल घेतला होता. या कर्जाचे काही हप्ते थकलेले होते. त्यामुळे फायनान्स कंपनीचे दोन कर्मचारी आशुतोष यांच्या घरी आले होते.  

यावेळी आशुतोष याचे आई-वडील तसेच बहिण घरी नव्हत्या. या कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी आशुतोष याला धमकावले. तसेच कर्जापोटी दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करू नका, मुलास धमक्या देऊ नका असे हटकल्यांनतर ते कर्मचारी निघून गेले होते.

या घडलेल्या प्रकारामुळे आशुतोष प्रचंड तणावात होता. त्यातच घरी कोणीच नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृत आशुतोष याच्या पश्चात आई-वडील व एक बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज