fbpx

शहरात भाऊ, दादा, आप्पा, मामा वाढले मात्र मनपाचे उत्पन्न घटले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहरात गल्लोगल्ली भाऊ, दादा, आप्पा आणि मामा असून ते सर्वांनाच ठाऊक आहे. गेल्या दोन वर्षात त्यात अधिकच भर पडली आहे. शहरात ठिकठिकाणी वाढदिवसाच्या आणि नेत्यांच्या आगमनाच्या शुभेच्छा देणारे फलक, बॅनर कायमच लागले असतात. मात्र चमकोगिरी करणाऱ्यांकडून महापालिकेला काही उत्पन्न देत मिळत नाही. गेल्या सात महिन्यांमध्ये मनपाला फलकबाजीतून केवळ २१ हजार ७१९ रुपयेच उत्पन्न मिळाले आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे मनपा हद्दीत जर कोणतेही फलक किंवा बॅनर लावायचे असेल तर एका स्क्वेअर फुटसाठी १ रुपया असे भाडे प्रतिदिवस आकारले जाते. गतवर्षी महानगरपालिकेला याच करातून २ लाख २२ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. ज्यात ५६३ नागरिकांनी करभाडे भरले होते. मात्र यंदा महानगरपालिकेकडे केवळ २१ हजार ७१९ इतकेच भाडे आले आहे.

खासगी शिकवण्या बंद असल्याने बसला मोठा फटका
महानगरपालिकेचे जाहिरातीतून येणारे मोठे स्त्रोत म्हणजे खाजगी शिकवण्याचे शहरभर लागणारे बॅनर आहेत. दरवर्षी या बॅनर मधूनच किमान १ लाख रुपये भाडं महानगरपालिकेला मिळते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच खासगी क्लासेस बंद असल्यामुळे महानगरपालिकेला येणारा मुख्य स्रोत बंद झाला असून त्याचा फटका महानगरपालिकेच्या वसुली विभागाला बसत आहे.

गतवर्षी अनधिकृत साडे हजार बॅनरची लावली विल्हेवाट
शहरात भाऊ, आप्पा, दादा व मामांसह इतर बॅनर अनाधिकृतपणे रस्त्यावर लावण्यात येतात. गतवर्षी असेच साडेचार हजार बॅनर अतिक्रमण विभागाने काढून त्याची विल्हेवाट लावली होती.

चमकोगिरी करणाऱ्यांचे काय?
शहरातील प्रत्येक सार्वजनिक भाग हा शासनाच्या मालकीचा असतो. शहरात नेहमी वाढदिवस, यश निवड आणि नेत्यांच्या आगमनाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकत असतात. मनपाच्या प्रवेशद्वारापासून दुभाजकांचे खांब आणि प्रमुख चौकात बॅनर लावण्यात येतात. नेत्यांसमोर चमकोगिरी करणाऱ्या पंटरकडून मनपाला उत्पन्न मिळत नसले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार २-३ जणांवर गुन्हे दाखल केल्यास इतरांना आळा नक्कीच बसेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज