राज्यातील पहिला कोट्यवधीचा भ्रष्टाचार खणून काढणारे, व्रतस्थ पत्रकार जगतरावनाना सोनवणे यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । धुळ्यातील दैनिक “मतदार”चे संस्थापक-संपादक, धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे व त्यासाठी पत्रपंडित पा.वा. गाडगीळ पुरस्कार मिळालेले, व्यासंगी, साक्षेपी पत्रकार, अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शक तसेच सेवा शर्तीविषयी गाजलेली पुस्तके लिहणारे, सोनदिपा पब्लिशर्सचे सर्वेसर्वा, कायद्याचे अभ्यासक श्री. जगतरावनाना सोनवणे यांचे आज, दि.१२ ऑगस्ट रोजी, दुपारी साडेतीन वाजता अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी निधन झाले.

बुधगाव (ता. चोपडा) हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी मरणोत्तर देहदानाची ईच्छा प्रकट केली होती. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार, काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता उद्या, बुधवारी, दि. ऑगस्ट रोजी, सकाळी ९ वाजता, देवापुरातील, एकविरा मंदिरजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

जिल्हा परिषदेतील नोकरीवर पाणी सोडून नानांनी “मतदार” हे सर्वसामान्य जनता, शेतकरी व वंचित समाजासाठी वाहिलेले वृत्तपत्र सुरू केले. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून काम पाहताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी सोनादिपा प्रकाशनाची स्थापना करून कर्मचारी व अधिकारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तके निर्मित केली. राज्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आस्थापना व न्याय संस्थेत ही पुस्तके संदर्भासाठी आजही वापरली जातात.

भास्कर वाघ प्रकरणात त्यांना गुंडांनी व राजकीय नेत्यांनी अतोनात त्रास दिला. तरीही नानांची लेखणी थांबली नाही. त्यांना व कुटुंबाला झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. त्यांनी खणून काढलेल्या या अपहार घोटाळ्याने तेव्हा सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रातील हा पहिला कोट्यवधीचा घोटाळा!
हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कारभारात अनेक बदल करण्यात आले.

गेले काही दिवस देशातील परिस्थिती आणि शेतकरी आंदोलन चिरडण्याचा सरकारी प्रयत्नांनी नाना अस्वस्थ होते. प्रकृती साथ देत नसतानाही ते कापडणे येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. चळवळीचा वारसा असलेल्या या गावातील सभेनंतर ते कमालीचे अस्वस्थ झाले होते.

पुरोगामी विचारांची बैठक पक्की असलेल्या नानांनी आयुष्यभर व्रतस्थ पत्रकारिता केली. सेवा शर्ती तसेच कायदेशीर बाबींबाबत ते शेवटपर्यंत सर्वसामान्यांना मोफत मार्गदर्शन करत होते. धुळे जिल्ह्यातील काटवन परिसर विकासासह अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -