fbpx

मासिक पाळी…गैरसमज

mi-advt

पाळी आली आहे ना? मग मंदिरात नको जाऊ, देवघरात नको जाऊ, प्रसाद नको खाऊ, कोणाला शिवायचं नाही, स्वयंपाक घरात शिरायचं नाही, चार-पाच दिवस वेगळं राहायचं…आणि खूप महत्त्वाचं म्हणजे लोणच्याच्या बरणीला हात लावायचा नाही. कारण ते नासेल (बाकी काही नाही, पण लोकांचे विचार नासलेत). पाचव्या दिवशी पाळी थांबली की आंघोळ करायची आणि शुद्ध व्हायचं. ओ गॉड…बस, बस, बस…वैताग आलाय या त्याच त्याच रटाळवाण्या गोष्टी ऐकून. कमाल वाटते या सगळ्याची! 21 व्या शतकात वावरताना आजही हे सर्रास चालतं. गावांमध्ये तर हे चालतंच. पण शहरातल्या वन-रूम किचनमध्येही असे प्रकार घडतात.

अस्पृश्य असल्यासारखी वागणूक दिली जाते. त्यात दुर्दैवं म्हणजे, अगदी उच्च शिक्षित महिलाही हे सारं खपवून घेतात. सणवार आणि समारंभाच्या टाइमटेबलनुसार शरीराचंही टाइमटेबल अॅडजस्ट केलं जातं. समजा नसेलच होत अॅडजस्ट तर लग्न, समारंभांना जाणं म्हणजे गैर. मला आजही आठवतंय, लग्न कार्यासाठी मैत्रिणीच्या गावी गेले होते. पण लग्नाच्या सकाळीच पाळी आली. त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना मी केला आहे. राहण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व वेगळं. पहिलाच अनुभव असा होता. दुसऱ्याच्या घरी जाऊन विरोध करावा तरी कसा करणार? हे सुद्धा कळत नव्हतं. ही वेळ अनेक महिलांवर येते. पण अशी वेळ महिलांवर का यावी? याचा विचार केला पाहिजे.

मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील फार महत्वाचा भाग आहे. जोवर स्त्रीला पाळी येत नाही, तोवर तिला पूर्णत्व नाही, अशी समाजात धारणा आहे. त्यामागील कारण म्हणजे पाळी आल्याशिवाय स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नाही. इतकी महत्वाची असलेली ही मासिक पाळी आजही अंधश्रद्धेने ग्रासलेली दिसते. मासिक पाळी म्हणजे काहीतरी घाण अशी भावना खेड्यापासून शहरापर्यंत सहज आढळून येते. पाळी आली की घराच्या बाहेर राहणं हे दृश्य ग्रामीण भागात सहज दिसतं. त्यातच त्या स्त्रीचा कुठे चुकून स्पर्श झालाच, तर ती जागा पाणी टाकून धुतली जाते किंवा त्यावर गोमूत्र टाकण्यात येते. म्हणजे गाईचे मूत्र पवित्र आणि आईला, बहिणीला येणारी पाळी अपवित्र, याचं काय लॉजिक आहे तेच कळत नाही

मासिक पाळी म्हणजे चार-चौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चाच होत नाही. केमिस्टकडे सॅनिटरी नॅपकिन दबक्या आवाजात मागितला जातो. केमिस्टवालाही अगदी सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून देणार. कशाला हवी एवढी लपवा-छपवी? मुंबईसारख्या शहरात ही परिस्थिती म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मासिक पाळी सुरू होणं म्हणजे दर महिन्याला महिलांच्या गर्भाशयात पेशी आणि रक्तवाहिन्यांचं एक अस्तर तयार होणं. आपण सर्वजण जन्माला आलो आहोत ते या अस्तराच्या कृपेमुळेच. आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध आणि विटाळ मानतो. नैसर्गिक क्रियेचा एवढा बाऊ का करावा? ज्या क्रियेमुळे स्त्रीला मातृत्व लाभलं, त्याच काळात तिला अशी वागणूक का द्यावी? परमेश्वरानंच जग निर्माण केलं म्हणता, मग त्याच जगाचा इतका महत्त्वाचा भाग अस्पृश्य कसा ठरेल? देव जर सर्वव्यापी असेल तर त्याला महिलांचा स्पर्श कसा टाळता येऊ शकतो? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

मासिक पाळी हा एका स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. एक नैसर्गिक क्रिया आहे. या क्रियेमुळे स्त्रीला मातृत्व लाभतं. मग या क्रियेला अशुभ आणि पाप मानणं योग्य नाही. अशा रुढी-परंपरांच्या नावाखाली स्त्रीयांची कुचंबना केली जाते. आपण आज खऱ्या अर्थानं स्त्री-पुरुष समानता मानतो, तर या चुकीच्या समजुतीतून बाहेर येणं गरजेचं आहे.मासिक पाळीदरम्यान मंदिरात जाण्यास बंदी घातली जाते. पण केरळमधील पार्वती देवीच्या मासिक धर्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवीच्या मासिक धर्माला प्रारंभ झाल्यानंतर पार्वती देवीची मूर्ती दुसऱ्या खोलीत नेली जाते. त्यानंतर हे मंदिर तीन दिवसांसाठी बंद ठेवलं जातं. मासिक पाळीच्या काळात देवीच्या मूर्तीमधून रक्तस्त्राव होतो, असा समज आहे. अनेक जण तर ते रक्त घरी नेतात. ते खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चार दिवस या विशेष महोत्सवाचं आयोजन केलं जातं. उत्सवाच्या चौथ्या दिवशी देवीच्या मूर्तीला नवे कपडे घातले जातात. त्यानंतर तिची हत्तीणीवरून मिरवणूक काढली जाते. अशाच प्रकारच्या उत्सवाचं आयोजन आसाममधील गुवाहाटी इथल्या कामाख्या मातेच्या मंदिरात केलं जातं. याला योनी-पीठ असेही म्हणतात.मासिक पाळीबद्दल चारचौघात कधीच कोणी बोलत नाही. अजूनही ग्रामीण भागात एखाद्या महिलेला पाळी आली तर तिला बाहेर बसावं लागतं. ग्रामीण भागातच काय, मुंबईसारख्या शहरातही हे काटेकोरपणे पाळलं जातं. या काळात देवाला हात नाही लावायचा, कोणाला शिवायचं नाही अशा गोष्टी महिलांना कराव्या लागतात. या सर्व गोष्टी महिलेला देवानंच दिल्या आहेत. मग देवाला हात लावण्यापासून किंवा मंदिरात जाण्यापासून का रोखलं जातं खेडेगावांमध्ये तर याहून भयानक परिस्थिती आहे. आधीच पाळीसंदर्भात बुरसटलेले विचार, त्यात स्वच्छतेचा तर खूप मोठा प्रश्न. मासिक पाळी विषयातलं अज्ञान आणि स्वच्छतेसंदर्भात माहिती नसल्यानं अनेक महिलांना इन्फेक्शन होतं. अनेक महिलांना योनीमध्ये जंतुसंसर्ग, गर्भाशयाचे आजार झाल्याचं

खेड्यांमध्ये हा प्रश्न खूपच मोठा आहे. ग्रामीण भागात आजही महिला त्या चार दिवसात कापडच वापरतात. एकच कापड धुवून पुन्हा पुन्हा वापरलं जातं. ते कापड कुठे तरी मग अंधारात किंवा कपड्याच्या आत दडवून ठेवलं जातं. तेच कापड पुन्हा वापरुन वापरुन त्यातून महिलांना जंतूसंसर्ग होतो. अखेर हे सर्व टाळण्यासाठी महिलांनी सॅनिटरी नॅपकिन वापरायला हवेत. सती, केशवपन, बालविवाह, हुंडा अशा बुरसटलेल्या रुढी-परंपरांना आपण फाटा दिला. त्या बंद करायला भाग पाडलं. मग मासिक पाळीच्या विषयावरच आपण अजूनही मागासलेले विचार घेऊन का जगत आहोत? पाळी संदर्भातल्या त्या जुनाट रुढी-परंपरांच्या बेड्या खरंतर कधीच मोडून टाकण्याची गरज होती. पण संधी आणि वेळ अजूनही गेलेली नाही. या! उद्याचं भविष्य जन्माला घालणाऱ्या आजच्या वर्तमानाला तितक्याचं पवित्रतेने स्वीकारुयात…त्याचा सन्मान करुयात

– वैशाली झाल्टे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज