जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । कोणत्याही देशाचा विकास हा तेथील लोकांच्या एकतेमध्ये दिसून येते. भारत देश किती तरी वर्षे गुलामगिरी मध्ये होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे देशातील लोकांमध्ये नसलेली एकता. यावल तालुक्यातील नायगाव येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीराम मंदिरात जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यात २१ जोडप्यांच्या हस्ते होमहवनासह मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. या संपूर्ण धार्मिक विधीत गावातील एका मुस्लिम जोडप्याने देखील सहभाग घेतला. मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा पूजेत स्थान मिळणे हे आमचे सौभाग्य आहे, असे सांगत या दाम्पत्याने एकात्मतेचा संदेश दिला.
मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागाची संधी मिळाली, हे आमचे भाग्य
तालुक्यातील नायगाव येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार नुकतेच झाला. यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिलला २१ जोडप्यांच्या हस्ते मंदिर जिर्णोद्धार पूजाविधी आणि रविवारी मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. या होमहवन कार्यक्रमात गावातील विनोद बाबू तडवी व त्यांच्या पत्नी जैनूर विनोद तडवी यांनी देखील सहभाग घेत संपूर्ण विधी हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्ण केला. प्रभु श्रीराम यांचे मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागाची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे असे या दाम्पत्याने सांगितले.
ग्रामस्थांकडून कौतुक
ग्रामस्थांनी देखील या दाम्पत्याचे कौतुक केले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, उपाध्यक्ष नारायण धर्माधिकारी, साहेबराव पाटील, पुंडलिक जवरे, नरेंद्र पाटील, अरूण पाटील, सुधाकर जावरे, नारायण पाटील, सदाशिव पाटील, नारायण चौधरी, शांताराम पाटील, सुनंदा पाटील, राजू पाटील, दगडू पाटील यांनी पुजेत सहभागी करून घेत आदर्श ठेवला.
श्रीराम मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त संगीतमय श्रीराम कथा सप्ताहाला सुरूवात झाली होती. यात सिता स्वयंवर, श्रीराम वनवास, भरत मिलाप, शबरीमाता, जटायू मिलन, श्री हनुमान भेट, राम-रावण युद्ध प्रसंग, रावण दहन व श्रीराम राज्याभिषेक असे प्रसंग कथन करण्यात आले. १० एप्रिलला श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. यानंतर ११ एप्रिल रोजी या कथेचे वक्ताश्री नितीन महाराज (मलकापूर) यांचे काल्याचे कीर्तन व सप्ताहाची सांगता होईल.