fbpx

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर १७ टक्के वरुन २८ टक्के करण्यात आला आहे. हा महागाई भत्ता वाढ १ ऑक्टोबर २०२१ पासून रोखीने देण्यात यावी, असा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील तब्बल 19 लाख अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गेल्या वर्षभरापासून गोठवण्यात आला होता. त्यानंतर आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

या वाढीमध्ये १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७ % इतकाच राहील, तसेच १ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे निर्देश आहेत.

दरम्यानच्या पाच महिन्यातील 10 टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकीही ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबतही सरकारनं लवकर निर्णय घ्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज